वाजिव श्रीहरी । मंजुळ बांसरी ।
पाजिव शांति-सुधा जिवास ॥
गीत | - | स. अ. शुक्ल |
संगीत | - | केशवराव भोळे, हिराबाई बडोदेकर, सुरेशबाबू माने, सवाई गंधर्व |
स्वर | - | हिराबाई बडोदेकर |
नाटक | - | साध्वी मीराबाई |
राग | - | मिश्र पिलू |
ताल | - | कवाली |
गीत प्रकार | - | हे श्यामसुंदर, नाट्यसंगीत |
हें मीरांबाईचें चरित्र नव्हे. तिच्या चरित्रावर विरचिलेलें नाटक आहे, ही गोष्ट प्रथमच सांगून टाकणें मला अवश्य वाटतें, अनेक भाषेंत मीरांबाईचीं चरित्रें प्रसिद्ध असून तीं सारीं निरनिराळ्या हकीकतींनी भरलेली आहेत. परंतु मीरांबाईची खरी आणि पुरी माहिती संकलित स्वरूपांत कोठेंच उपलब्ध नव्हती. ती उणीव बडोद्याच्या साहित्य-विजय मालेनें भरून काढली आहे.
ऐतिहासिक आधारावरून लिहिलेल्या, त्या मालेतर्फे प्रसिद्ध झालेल्या चरित्राचाच थोडा फार उपयोग हें नाटक लिहिण्यासाठी मला झाला. सामान्यतः सर्व साधु संतांच्या तेजस्वी चारित्र्य-पटलावर अनेक अलौकिक चमत्कारांचें आणि असंभाव्य आख्यायिकांचें दाट आवरण पडलेलें असतें. तीच स्थिति मीरांबाईच्या जीवन-वृत्तांताची झाली आहे. मीरांबाईच्या जीवनवृत्तांतांतील प्रचलित आख्यायिकांचे, तसेच ऐतिहासिक आधारांचेहि धागे शक्य तों कायम ठेवून, नाट्यप्रसंगांच्या उठावासाठीं आणि पात्रांच्या स्वभावपरिपोषासाठीं कांहीं नवीन प्रसंग निर्माण करून, त्यांची एकत्र सांगड घालण्याचा प्रस्तुत नाटकांत प्रयत्न केला आहे.
'नूतन संगीत विद्यालयाची' नवीन नाट्यशाखा निर्माण करून अल्पावधींतच ती नांवारूपाला आणली, याबद्दल संस्थेचे कर्तबगार डायरेक्टर श्री. नानासाहेब हर्डीकर यांचे आभार नाट्य-प्रेमी महाराष्ट्र-रसिकांतर्फे मानूं कीं, हें नाटक माझ्याकडून लिहवून घेऊन तें, विशेष हौसेनें आणि नव्या थाटानें सजवून रंगभूमीवर आणलें याबद्दल मी त्यांचें व्यक्तिविषयक आभार मानूं, हेंच मला यावेळीं सुचत नाहीं म्हणून हें गोड काम मी तसेंच अपुरें ठेवतों.
पदांच्या सुश्राव्य व रसपरिपोषक चाली मुख्यतः सौ. हिराबाई, श्री. सवाईगंधर्व, प्रो. सुरेशबाबू व श्री. केशवराव भोळे यांनी दिल्या. मी त्यांचा आभारी आहें.
(संपादित)
सदाशिव अनंत शुक्ल
दि. ६ फेब्रुवारी १९३०
'साध्वी मीरांबाई' या नाटकाच्या पुस्तकाच्या प्रथमावृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- परचुरे, पुराणिक आणि मंडळी, मुंबई.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.