A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
बोलले इतुके मज श्रीराम

शेवटीं करितां नम्र प्रणाम
बोलले इतुके मज श्रीराम-

"अयोध्येस तूं परत सुमंता
कुशल आमुचें कथुनी तांतां
पदवंदन करि माझ्याकरिंता
तातचरण ते वंदनीय रे, शततीर्थांचें धाम"

"अंतःपुरिं त्या दोघी माता
अतीव दुःखी असतिल सूता
धीर देई त्या धरुनी शांतता
सौख्य आमुचे सांगुन त्यांच्या शोका देई विराम"

"सांग माउली कौसल्येसी
सुखांत सीता सुत वनवासी
पूजित जा तूं नित्‌ अग्‍निशीं
तुझिया श्रवणीं सदा असावा मुनिवरघोषित साम"

"वडीलपणाची जाणिव सोडुनि
सवतींशीं करि वर्तन जननी
मग्‍न पतीच्या रहा पूजनीं
तव हृदयाविन त्या जिवासी अन्य नसे विश्राम"

"राजधर्म तूं आठव आई
अभिषिक्तातें गुण वय नाहीं
दे भरतासी मान प्रत्यहीं
पढव सुमंता, विनयाने हें, सांगुन माझे नाम"

"सांग जाउनी कुमार भरता
हो युवराजा, स्वीकर सत्ता
प्रजाजनांवर ठेवी ममता
भोग सुखाचा अखंड घेई, मनिं राही निष्काम"

"छत्र शिरावर तुझ्या पित्याचें
पाळच वत्सा, वचन तयांचें
सार्थक कर त्या वृद्धपणाचें
राज्य नीतिनें करुन वाढवी रघुवंशाचें नाम"

"काय सांगणे तुज धीमंता,
उदारधी तूं सर्व जाणता
पुत्रवियोगिनि माझी माता
तुझ्या वर्तनें तिला भासवी भरत तोच श्रीराम"

बोलत बोलत ते गहिंवरले
कमलनयनिं त्या आसूं भरलें
करुण दृश्य तें अजून न सरले -
गंगातीरीं-सौमित्रीसह-उभे जानकी-राम
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वराविष्कार- सुधीर फडके
∙ आकाशवाणी प्रथम प्रसारण
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
राग - जोगकंस
गीत प्रकार - गीतरामायण, राम निरंजन
  
टीप -
• गीतरामायण.
  • प्रथम प्रसारण दिनांक- १९/८/१९५५
  • आकाशवाणीवरील प्रथम प्रसारण स्वर- गजानन वाटवे.
अंत:पुर - राणीवसा, अंतर्गृह, माजघर.
अभिषिक्त - ज्याच्यावर अभिषेक झाला आहे असा, राजा.
उदारधी - उदारतेत वरचढ.
प्रत्यही - अखंड.
वत्स - मूल.
सुत - पुत्र.
सामवेद - चार वेदांतील तिसरा वेद.
सौमित्र - लक्ष्मण (सुमित्रेचा पुत्र).

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


Random song suggestion
  सुधीर फडके
  आकाशवाणी प्रथम प्रसारण