संसारामधि ऐस आपुला उगाच भटकत फिरूं नको
चल सालसपण धरुनि निखालस खोट्या बोला बोलुं नको
अंगि नम्रता सदा असावी राग कुणावर धरूं नको
नास्तिकपणांत शिरुनि जनाचा बोल आपणां घेउं नको
भली भलाई कर कांहीं पण अधर्ममार्गीं शिरूं नको
मायबापांवर रुसूं नको
दूर एकला बसूं नको
व्यवहारामधिं फसूं नको
कधीं रिकामा असूं नको
परि उलाढाली भलत्यासलत्या पोटासाठीं करूं नको
संसारामधि ऐस आपला उगाच भटकत फिरू नको
वर्म काढुनी शरमायाला उणें कुणाला बोलुं नको
बुडवाया दुसर्याचा ठेवा करुनी हेवा झटूं नको
मी मोठा शहाणा जगामधि गर्वभार हा वाहुं नको
एकाहुनि एक चढी जगामधि थोरपणाला मिरवुं नको
हिमायतीच्या बळें गरिबगुरिबाला तूं गुरकावुं नको
दो दिवसांची जाइल सत्ता अपयश माथां घेउं नको
बहुत कर्जबाजारी होउनि बोज आपुला दवडुं नको
स्नेह्यासाठीं पदरमोड कर परंतु जामिन राहुं नको
विडा पैजेचा उचलुं नको
उणी तराजू तोलुं नको
गहाण कुणाचें बुडवुं नको
असल्यावर भिक मागुं नको
नसल्यावर सांगणें कशाला गांव तुझा भिड धरूं नको
कष्टाची बरि भाजिभाकरी तूपसाखरेचि चोरि नको
दिली स्थिती देवानें तींतच मानीं सुख कधिं विटूं नको
आल्या अतिथा मुठभर द्याया मागेंपुढती पाहुं नको
उगीच निंदास्तुती कुणाची स्वहितासाठीं करूं नको
बरी खुशामत शाहण्याची ही मूर्खाची ती मैत्रि नको
आतां तुज ही गोष्ट सांगतों सत्कर्मा ओसरूं नको
असल्या गांठीं धनसंचय कर सत्कार्यी व्यय हटूं नको
सुविचारा कातरूं नको
सत्संगत अंतरूं नको
द्वैताला अनुसरूं नको
हरिभजना विस्मरूं नको
गावयास अनंतफंददिचे फटके मागें सरूं नको
सत्कीर्तिनौबदिचा डंका वाजे मग शंकाच नको
गीत | - | अनंत फंदी |
संगीत | - | शाहीर साबळे |
स्वर | - | शाहीर साबळे |
गीत प्रकार | - | लोकगीत |
उणा तराजू तोलणे | - | वजनकाट्यात फसवणूक करणे. |
धोपट | - | सरळ. |
निखालस | - | खात्री, निर्विवाद. |
बोज | - | प्रतिष्ठा / महत्त्व. |
मति | - | बुद्धी / विचार. |
वर्म | - | दोष, उणेपणा / खूण. |
हिमायत | - | पाठबळ, मोठ्याचा आश्रय. |
लंडेगुंडे हिरसेतट्टू ह्यांची संगत धरूं नको
नरदेहासी येउन प्राण्या दुष्ट वासना धरूं नको
भंगीचंगी बटकीसटकी ह्यांच्या मेळ्यांत बसूं नको
बिकट वाट वहिवाट नसावी धोपट मार्गा सोडुं नको
संसारामधि ऐस आपुला उगाच भटकत फिरूं नको
परधन परनार पाहुनी चित्त भ्रमुं हें देउं नको
नास्तिकपणांत शिरुनि जनाचा बोल आपणां घेउं नको
भली भलाई कर कांहीं पण अधर्ममार्गीं शिरूं नको
मायबापांवर रुसूं नको
दूर एकला बसूं नको
व्यवहारामधिं फसूं नको
कधीं रिकामा असूं नको
परि उलाढाली भलत्यासलत्या पोटासाठीं करूं नको
वर्म काढुनी शरमायाला उणें कुणाला बोलुं नको
बुडवाया दुसर्याचा ठेवा करुनी हेवा झटूं नको
मी मोठा शहाणा धनाढ्यहि गर्वभार हा वाहुं नको
एकाहुनि एक चढी जगामधि थोरपणाला मिरवुं नको
हिमायतीच्या बळें गरिबगुरिबाला तूं गुरकावुं नको
दो दिवसांची जाइल सत्ता अपेश माथां घेउं नको
बहुत कर्जबाजारी होउनि बोज आपुला दवडुं नको
स्नेह्यासाठीं पदरमोड कर परंतु जामिन होउं नको
विडा पैजेचा उचलुं नको
उणी तराजू तोलुं नको
गहाण कुणाचें डुलवुं नको
असल्यावर भिक मागुं नको
नसल्यावर सांगणें कशाला गांव तुझा भिड धरूं नको
उगीच निंदास्तुती कुणाची स्वहितासाठीं करूं नको
बरी खुशामत शाहण्याची ही मूर्खाची ती मैत्रि नको
कष्टाची बरि भाजिभाकरी तूपसाखरेचि चोरि नको
आल्या अतिथा मुठभर द्याया मागेंपुढती पाहुं नको
दिली स्थिती देवानें तींतच मानीं सुख कधिं विटूं नको
असल्या गांठीं धनसंचय कर सत्कार्यी व्यय हटूं नको
आतां तुज ही गोष्ट सांगतों सत्कर्मा ओसरूं नको
सत्कीर्तिनौबदिचा डंका गाजे मग शंकाच नको
सुविचारा कातरूं नको
सत्संगत अंतरूं नको
द्वैताला अनुसरूं नको
हरिभजना विस्मरूं नको
गावयास अनंतफंददिचे फटके मागें सरूं नको
संदर्भ-
म. वा. धोंड
मर्हाटी लावणी
सौजन्य- मौज प्रकाशन, मुंबई.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.