कायिक वाचिक नच याग निभावे । हृदयिं रिघे देव ॥
गीत | - | वा. वा. खरे |
संगीत | - | मास्टर दीनानाथ |
स्वर | - | मास्टर दीनानाथ |
नाटक | - | उग्रमंगल |
राग | - | देसी |
ताल | - | त्रिवट |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत |
याग | - | पूजा. |
रिघणे | - | शिरणे / प्रवेशणे. |
तिसर्या अंकांच्या अखेरच्या प्रवेशांत लक्ष्मणसिंगाचा मानभंग करण्यासाठीं त्याला ठेंगण्या दरवाजांतून आणण्याचा प्रकार दाखविला आहे, तो कित्येकांस ओढून ताणून जुळविलेला भासतो. पण खरी गोष्ट तशी नाही. चिकबाळापूरच्या मानी देसायांची मान वाकविण्यासाठीं हैदरअल्लीनें त्याला ठेंगण्या दरवाजांतून आणण्याची शक्कल लढविली होती. त्या वेळीं त्या देसायानें नाटकांतल्या लक्ष्मणसिंगाप्रमाणें वागून उलट हैदराचीच भरदरबारांत फजीती केली हें, म्हैसूरच्या इतिहासांत नमूद आहे. गेल्या आक्टोबरांत कराची येथें मौलाना शौकतअल्ली वगैरे ज्या सहा धर्मभक्तांवर खटला झाला त्यापैकी पीर गुलाम मुजादिद यांनी आपल्या जबानींत असें सांगितले कीं, आपल्या पूर्वजाला नम्र-कंधर करण्यासाठीं जहांगीर बादशहानें त्याला मुद्दाम एका ठेंगण्या दरवाजातून आपल्यासमोर आणण्याचा यत्न केला होता, परंतु आपल्या पूर्वजानें तो सिद्धीस जाऊं दिला नाहीं. हे या बाबतीत आणखी एक उदाहरण देतां येण्याजोगें आहे.
बहामनी बादशाहीच्या एका सरदारानें विजयनगरच्या राजपुत्राच्या दरबारांत कलावंतिणीच्या वेषानें प्रवेश केला आणि त्या राजपुत्रास कट्यारीचा नाच दाखविण्याचा बहाणा करून अखेरीस दगा केला, असा मजकूर मुसलमानी इतिहासांतून आलेला आहे.
रामचंद्रपंत अमात्य यांस ताराबाईनें कैदेंत ठेविलें तेव्हां त्यांचा श्रेष्ठपणाचा दर्जा राखण्यासाठीं त्यांस रुप्याची बेडी घातली होती, ही गोष्ट बखरींतून लिहिलेंली आढळते.
स्त्रीचें सेनापत्य, शत्रूस जरब देण्यासाठी त्याच्या नातलगास तोफेच्या तोंडीं बांधणें, अथवा त्याचा कडेलोट करण्याचा धाक घालणें, खोटीं पत्रें पाठवून शत्रूची दिशाभूल करणें, या गोष्टींपैकी इतिहासाच्या वाचकांस अपरिचित अशी कोणतीच नाहीं.
या नाटकांत कलावती व विद्याधर यांच्या लग्नाचें उपकथानक आणिलें आहे. तें मूळचें कथासरित्सागरांतले असून नाटकासाठीं त्याचा उपयोग करून घेतांना आम्हीं त्यांत कांहीं फेरबदल केला आहे.
'बलवंत संगीत नाटक मंडळी'चे मालक रा. कोल्हटकर, व रा. मंगेशकर व रा. कोल्हापुरे यांनी नाटक परिश्रमपूर्वक बसविलें व पदांच्या चाली दिल्या. याबद्दल त्यांचे आभार मानणें हें या प्रस्तावनालेखांतलें महत्त्वाने पहिलें, परंतु कमाने शेवटचें कलम होय.
(संपादित)
वासुदेव वामन खरे
दि. २३ मे १९२२
'उग्रमंगल' या नाटकाच्या पुस्तकाच्या द्वितीयावृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- वासुदेव वामन खरे (प्रकाशक)
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.