नवखंड देह नटला । दिलदार प्यार राया ॥
मागें सदा फिराया । भागे अनंत काया ।
लागे जिवास माया । लाभे परि न राया ।
हातीं अखंड भरला । इष्के शराबे प्याला ।
नाहीं अजून प्याला । दिलदार प्यार राया ॥
गीत | - | गोविंदाग्रज |
संगीत | - | मास्टर दीनानाथ |
स्वराविष्कार | - | ∙ मास्टर दीनानाथ ∙ पं. जितेंद्र अभिषेकी ( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. ) |
नाटक | - | राजसंन्यास |
चाल | - | वख्ते तुल्ख देखा |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत |
अपूर्ण नाटकाचा सुद्धा प्रयोग पाहायला प्रेक्षकांनी गर्दी करावी असे दाखले किर्लोस्कर आणि देवल यांच्या जमान्यात सापडतात. सबंध नाटक लिहून पूर्ण झालेले नसले तरी 'शाकुन्तल' नाटकाचा पहिल्या फक्त चार अंकांचा आणि 'सौभद्र', 'रामराज्यवियोग,' 'शापसंभ्रम' आणि 'शारदा' या नाटकांच्या पहिल्या फक्त तीन अंकांचा प्रयोग पाहायला प्रेक्षक गर्दी करीत असत आणि तो पाहून संतुष्टही होत असत. 'रामराज्यवियोग' हे नाटक अपूर्णच राहिले असताना अण्णासाहेब किर्लोस्कर मरण पावले. तरीही त्या अपूर्ण नाटकाचे प्रयोग १९२८ सालापर्यंत होत होतेच. 'रामराज्यवियोगा'नंतर 'राजसंन्यास' हे असे एकच नाटक आहे की नाटककाराच्या मृत्यूमुळे अपूर्ण राहूनही ज्याचे प्रयोग रंगभूमीवर होत राहिले. त्यांपैकी एका नाटकात राज्यवियोग आहे, तर दुसर्या नाटकात राजसंन्यास आहे !
किर्लोस्कर आणि देवल यांच्या नाटकांचे संगीत हे एक प्रमुख आकर्षण आहे. 'राजसंन्यास' नाटकात एकंदर सहा पदे असून ती सर्व पाचव्या अंकात आहेत. पण संगीत हे 'राजसंन्यास' नाटकाचे आकर्षण नाही.
गडकर्यांच्या मृत्यूनंतर रंगभूमीवर आलेल्या त्यांच्या 'एकच प्याला' आणि 'भावबंधन' या नाटकांनी आखिल महाराष्ट्राला अक्षरशः भारून टाकले होते आणि म्हणूनच, त्यांचे अपूर्ण 'राजसंन्यास' नाटकसुद्धा रंगभूमीवर आलेच पाहिजे अशी जाणकार रसिकांची मागणी होती. १९२२ साली 'बलवंत संगीत मंडळी'चा मुक्काम इंदूर येथे होता. त्यावेळचे इंदूर संस्थानचे अधिपती, सवाई तुकोजीराव होळकर, हे कलावंतांचे चाहते आणि आश्रयदाते होते. गडकर्यांची नाटके त्यांच्या फार आवडीची होती. महाराजांनी स्वतः स्थापन केलेल्या 'यशवंत संगीत मंडळी'ची सुरवात गडकर्यांच्या 'पुण्यप्रभाव' या नाटकाने केली होती. तुकोजीरावांच्या आग्रहामुळे 'बलवंत संगीत मंडळी'चे मालक चिंतामणराव कोल्हटकर, मास्तर दीनानाथ आणि कृष्णराव कोल्हापुरे यांनी 'राजसंन्यास' नाटकाचा एक प्रयोग सवाई तुकोजीरावांसमोर, आमंत्रितांच्या उपस्थितीत, करून दाखविला. पश्चात्तापदग्ध संभाजीच्या भूमिकेचा तुकोजीरावांवर परिणाम होऊन ते इतके बेचैन झाले की, त्यावर उतारा म्हणून, 'राजसंन्यास' नाटकाचा प्रयोग संपल्यावर 'भावबंधन' नाटकातला कामण्णाचा एक विनोदी प्रवेश करायला त्यांनी 'बलवंत मंडळी'ला भाग पाडले !
फार तर दोन-अडीच तास चालणारा अपूर्ण 'राजसंन्यास' नाटकाचा सार्वजनिक प्रयोग प्रेक्षकांना कितपत रुचेल याबद्दल 'बलवंत मंडळी'चे मालक साहजिकच साशंक होते. इंदूरनंतरच्या नाशिकच्या मुक्कामात २३-७-१९२२ रोजी फक्त एकच प्रयोग करून, मुंबई येथील पहिला सार्वजनिक प्रयोग 'बलवंत मंडळी'ने ६-८-१९२२ रो अॅन्टरोड येथील बाँबे थिएटरात केला. चिमुकले नाटक म्हणून 'बलवंत मंडळी'ने हा प्रयोग रविवारी सकाळी केला. मराठी रंगभूमीवरील पहिला 'मॅटिनी शो' असे त्या प्रयोगाचे वर्णन करता येईल. गडकऱ्यांच्या प्रतिभेने प्रेक्ष इतके भारले गेले होते की, 'बलवंत मंडळी'ला 'राजसंन्यास' नाटकाचे अनेक प्रयोग करावे लागले.
गडकर्यांच्या सर्व नाटकांत भाषेचा उपयोग एखाद्या शस्त्रासारखा केलेला आहे. उत्तम भाषा लिहिण्याची हौस मराठी नाटककारांत गडकर्यांनी निर्माण केली. " 'राजसंन्यास' नाटक म्हणजे गडकर्यांनी केलेला वाग्यज्ञ आहे.", असे विधान प्रल्हाद केशव अत्रे यांनी केले आहे.
(संपादित)
वसंत शांताराम देसाई
'गडकर्यांची नाट्यसृष्टी' या वसंत शांताराम देसाई लिखित पुस्तकातून.
सौजन्य- सोमैया पब्लिकेशन्स प्रा. लि., मुंबई.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.