A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
बलसागर भारत होवो

बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो

हे कंकण करि बांधियले, जनसेवे जीवन दिधले
राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो

वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन
तिमिर घोर संहारिन, या बंधु सहाय्याला हो

हातात हात घालून, हृदयास हृदय जोडून
ऐक्याचा मंत्र जपून, या कार्य करायाला हो

करि दिव्य पताका घेऊ, प्रिय भारतगीते गाऊ
विश्वास पराक्रम दावू, ही माय निजपदा लाहो

या उठा करू हो शर्थ, संपादु दिव्य पुरुषार्थ
हे जीवन ना तरि व्यर्थ, भाग्यसूर्य तळपत राहो

ही माय थोर होईल, वैभवे दिव्य शोभेल
जगतास शांती देईल, तो सोन्याचा दिन येवो
गीत - साने गुरुजी
संगीत - वसंत देसाई
स्वराविष्कार- आकाशवाणी गायकवृंद, वाणी जयराम
सुधीर फडके
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
गीत प्रकार - स्फूर्ती गीत
  
टीप -
• स्वर- आकाशवाणी गायकवृंद, संगीत- वसंत देसाई.
• स्वर- सुधीर फडके, संगीत- सुधीर फडके.
कंकण बांधणे - अंगिकृत गोष्टीचा अभिमान बाळगणे.
लाहणे - लाभणे, मिळणे.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  आकाशवाणी गायकवृंद, वाणी जयराम
  सुधीर फडके