मी ह्मणु गोपाळु, आला गे माये ॥१॥
चांचरती चांचरती बाहेरी निघालें ।
ठकचि मी ठेलें काय करूं ॥२॥
तो सांवळा सुंदरू कांसे पीताम्बरू ।
लावण्य मनोहरू देखियेला ॥३॥
बोधोनी ठेलें मन तंव जालें आन ।
सोकोनी घेतले प्राण माझे गे माये ॥४॥
बाप रखुमादेवीवरू विठ्ठल सुखाचा ।
तेणें काया मने वाचा वेधियेलें ॥५॥
गीत | - | संत ज्ञानेश्वर |
संगीत | - | पं. हृदयनाथ मंगेशकर |
स्वराविष्कार | - | ∙ लता मंगेशकर ∙ किशोरी आमोणकर ( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. ) |
गीत प्रकार | - | संतवाणी |
टीप - • स्वर- पं. हृदयनाथ मंगेशकर, संगीत- लता मंगेशकर. • स्वर- किशोरी आमोणकर, संगीत- किशोरी आमोणकर. |
अळुमाळू | - | अल्प. |
आन | - | श्वासोच्छ्वास / जगणे. |
कांस | - | कंबर. |
ठक | - | भूल / स्तंभन / थक्क. |
ठेला | - | उभा राहिलेला / कुंठित. |
’अवचिता परिमळु, झुळुकला अळुमाळू’. अगदी अचानक, अलगद, हलकासा पवित्र सुगंध जाणवला. कल्पना करा, एखादी विरही स्त्री, प्रेयसी, तिच्या प्रियकराची किंवा पतीची खूप दिवसांपासून अगदी आतुरतेने वाट पाहते आहे. त्याच्याबद्दलच्या विचारात मग्न झाली आहे. आणि अचानक तिला दाराशी कुणी असल्याचा भास होतो. दाराशी एक परिचित गंध जाणवतो. जणू तोच आहे दारापाशी. ती डोक्यावरून पदर घेते आणि जरा घाबरतच, आशेने दाराशी जाते. 'मी म्हणे गोपाळू आला गे माये'. मला वाटते माझा प्रियकर आला. आता प्रतीक्षा संपली. 'चांचरती चांचरती बाहेरी निघालें.' परंतु बाहेर येऊन पहाते तर कोणीच नाही. 'ठकचि मी ठेलें”. फसले कि काय? पण असं कसं होईल? तोच तो गंध, त्यांचाच. काय करू? इथे तर दिसत नाहीत. म्हणून ती दारातून परत फिरू पहाते तर ते समोरून येताना दिसतात. किती दिवस वाट पाहायला लावली. सतत नामस्मरण करते आहे. 'तो सावळा सुंदरू कांसे पितांबरू । लावण्य मनोहरू देखियेला'. स्वतःला चिमटा काढून बघते. भास तर नाही? नाही गं. तोच तो माझा, सावळा, श्रीहरी. ते काय तेच ते नेहमीचे पितांबर. तोच तो, त्याचाच अलौकिक परिमळ. आणि काय? समोर येऊन उभा ठाकला की. काय करू? 'बोधुनी ठेलें मन तंव जालें आन'. माझी नजर, माझे मन, त्याच्या त्या रूपावर खिळूनच राह्यले. आन म्हणजे माझे श्वास त्याचेच होऊन गेले. अशी अवस्था झाली कि, 'सोकोनी घेतले प्राण माझे गे माये'. त्याने जणू माझा प्राण शोषून घेतला. पायातलं बळच गेलं. त्याच्या आठवणींनी मन विव्हल झालेले असताना तो समोर येऊन ठाकला, की काय वेगळी अवस्था होणार?
या विराणीतील शेवटची ओळ, 'बाप रखुमादेविवरु विठ्ठल सुखाचा । तेणे कायामनेंवाचा वेधियेलें' वाचल्यावर, कदाचित ही बाप-लेकीची भेट असावी असे देखील वाटते. सासरी असलेली, आईविना पोर, आतुरतेने आपल्या बापाची वाट पहाते आहे. परंतु विराणी मध्ये सहसा असे नाते नसते. कारण विरहाबरोबर तीत शृंगार देखील असतो. विराणीमध्ये भक्त, स्वतःला स्त्री समजून उपासना करतो. ही मधुरा भक्ती आहे. इथे ‘बाप’ हा शब्द थोर किंवा देव किंवा देवांचा देव या अर्थी देखील असू शकेल. कारण विठ्ठलाचा असा उल्लेख बर्याच अभंगातून येतो.
सततच्या नाम स्मरणामुळे अशा प्रकारच्या अनुभूती येतात. ही अवस्था, म्हणजे आभास नव्हे तर अनुभव आहे. ज्यांनी घेतला, त्यांनी त्याचे वर्णन विविध पद्धतीने केले आहे. अनुभूतिला इंग्रजी मध्ये 'awakening' म्हणता येईल. एकाच प्रकारचा संतत नाद, मेंदुतील delta लहरी जागृत करतो. या लहरी मेंदूला अतिशय आनंदित करतात. आणि एक प्रकारच्या सकारात्मक ग्लानी मध्ये नेतात. ही निर्विचार अवस्था असते.
इंग्रजी शब्द enlighten म्हणजे, मराठी मध्ये आत्मज्ञान. Enlighten होणे म्हणजे आत्मज्ञान प्राप्त होणे. हे प्राप्त करण्यासाठी meditation किंवा ध्यान हे साधन आहे. साधना केल्याशिवाय आत्मज्ञान होत नाही. मेंदूच्या neurons मध्ये होणारा हा काही केमिकल लोचा आहे का? या अवस्थेमध्ये जे काही होते, ते आभास आहेत का? उदाहरणार्थ, ज्ञानोबा-तुकोबांना पांडुरंगाचे दर्शन होणे, समर्थांना रामरायाचे दर्शन होणे, मीरेला कृष्ण भेटणे. सततच्या नामस्मरणामुळे या प्रकारचे आभास होतात का? की खरेच दर्शन होते? ज्या मूर्तीचे ध्यान सातत्याने केले, ज्या नामाची आणि मूर्तीची एकमेकांशी संलग्नता आहे, ते नाम घेतल्यानंतर, तशीच सजीव मूर्ती दिसते? बोलते? प्रश्न सोडवते? दुःख नाहीसे करून सुख, समाधान, समृद्धी देते? नक्की काय होते? विठ्ठलाचे नामस्मरण करत असताना, रामाची किंवा गणपतीची मूर्ती समोर असेल आणि दर्शन घडले (आपल्याला अशक्य आहे ते) तर प्रत्यक्षात समोर कोण येईल? विठ्ठल की रामराया, कि गणपती? माणसांचे देव, माणसांसारखे दिसतात, तर एखाद्या मांजराचा देव, मांजरासारखा दिसेल?
या सर्व संत सज्जनांना नक्की काय अनुभव आला? ही अवस्था, म्हणजे आभास नव्हे तर अनुभव आहे. ज्यांनी घेतला, त्यांनी त्याचे वर्णन विविध पद्धतीने केले आहे. ज्ञानदेव म्हणतात, 'जाणे अज मी अजर । अक्षय मी अक्षर । अपूर्व मी अपार । आनंद मी ॥’ अज म्हणजे जन्मरहित, अजर म्हणजे ज्याला मृत्यू नाही. अक्षय म्हणजे ज्याच्यात कोणतीही घट होत नाही, तर अक्षर म्हणजे जे संपत नाही. अपूर्व म्हणजे एकमेव आणि अपार म्हणजे असीम- ज्याची सीमा नाही असा. असा कोण आहे तर 'मी” स्वतः आहे. याची जाणीव होणे म्हणजे आत्मज्ञान होणे. अवघ्या चराचरात परमेश्वर भरून राहिला आहे, आणि तो माझ्यादेखील कणाकणात आहे. म्हणजे तो आणि मी काही वेगळे नाही आहोत, याची जाणीव होणे.
Thermodynamics चा पहिला नियम, Energy can neither be created nor destroyed, it can only be transformed from one form to another. ऊर्जा ना निर्माण करता येते ना नष्ट करता येते. ती सर्वत्र भरून आहे. आज या गोष्ठी विज्ञानाने सिद्ध झाल्या आहेत. या आपल्याला देखील माहित आहेत आता. परंतु त्याची आंतरिक जाणीव होणे महत्वाचे. तुकोबाराय, सतराव्या शतकातील संत कवी, म्हणतात, 'अणुरेणीयां थोकडा, तुका आकाशाएवढा” ही जाणीव या अशा अनुभूतीमधून होते.
बौद्ध धर्माप्रमाणे, आत्मज्ञान ही अंतिम अध्यात्मिक अवस्था आहे. कि जेव्हा सर्वज्ञान होते, भोग किंवा त्रासातून मुक्तता होते. म्हणजे काही रोगराई, अवहेलना, भूक, यापासून सुटका नाही होत. तर, अशा प्रकारच्या घटनांनी मनाला त्रास देणारे, दु:ख देणारे विचार मनात येणे थांबते. असीम मानसिक शांतता मिळते. या विश्वाचा अर्थ समजून येतो. कार्य-कारण भाव समजतो. ही आनंदाची परिसीमा आहे. या अवस्थेला पोहोचण्यासाठी संतांचा अट्टाहास असतो.
Alpha band आंदोलने ही मेंदूतील अतिशय प्रबळ अशी आंदोलने आहेत. आधुनिक शास्त्राला आता पुरावे मिळालेत कि या waves चे कार्य प्रतिबंधात्मक आहे. एवढेच नाही तर अशीही शंका आहे, कि ही आंदोलने, माहिती प्रक्रियेमध्ये अतिशय मोलाचे काम करतात. बोध होणे ही क्रिया ही या आंदोलनांचा परिणाम आहे. योगिक पद्धतीने अशा प्रकारची आंदोलने वाढवता येतात आणि ज्ञान मिळवता येते. याची माहिती आपल्या ऋषी-मुनी, संत लोकांना माहित होती. ऋषी म्हणजे वैज्ञानिक, ज्यांनी आंतरिक ज्ञानाची साधना केली. संत सज्जनांनी भक्तीयोगाद्वारे तेच साध्य केले. आणि प्रसार देखील केला.
वैज्ञानिक दृष्ट्या आता हे सिद्ध झाले आहे. त्या GOD particle चा देखील शोध लागला आहे. एवढेच नाही तर त्याहूनही अधिक सूक्ष्म काही आहे, असे देखील आता वैज्ञानिक म्हणू लागलेत. परंतु त्यासाठी १० बिलियन डॉलर्स खर्च आला आणि ३० वर्षे लागली. आणि त्यानंतरही ते दिसले नाहीच, तर ते असल्याच्या खुणा मिळाल्या. हेच ते परमतत्व, चैतन्य. हेच कळत असेल का अशा अवस्थेत. Alpha waves च्या मेंदूतील आंदोलनांमुळे, ज्ञान प्राप्ती होते.
(संपादित)
मिनिष उमराणी
सौजन्य- ganyamagchikavita.wordpress.com
(Referenced page was accessed on 8 Jan 2025)
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.