A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सावलीत माझ्या कवडसे

सावलीत माझ्या कवडसे माझे
रुपेरी, रुपेरी
कधी सावळेसे
कधी या उन्हाचे हळुवार येणे
दुपारी, दुपारी
तरी कोवळेसे

ओढ अनावर ओढून नेते
माझ्या तीरावर, उभी मी कधीची
अस्ता आधीच अंत झाला
रस्त्यामध्ये सांज झुरते कधीची
कळेना मनाची, दिशा कोणतीही
किनारे, किनारे
कधी भोवरेसे

ॠतुंना कसे सांगू? बहरू नका रे
मला पानझड ही आता सोसवेना
नव्याने फुलावे हवे वाटते पण,
नको तो फुलांचा कहर सोसवेना
उजळून येती क्षणांचे निखारे
टपोरे, टपोरे
कधी बावरेसे

रोखून धरले तरी आवरेना
ते अश्रू मी सोडून आले कधीची
तरी उष्णसा थेंब उरला उशाला
कळा सोसुनी रात्र निजली कधीची
विझलेली स्वप्‍ने मन सावरते
अधुरे, अधुरे
कधी कोरडेसे

असे शांत होणे मला पेलवेना
सुखाची अनोळखी चाहूल लागे
असे मोकळे श्वास होतात तेंव्हा
उबेचा शहारा अलवार मागे
हे माझेच आहे, मला का कळेना
असुदे, असुदे
जरी वेगळेसे