A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
असाच यावा पहाटवारा

असाच यावा पहाटवारा जसा वितळतो पावा
आरसपानी सूर मुलायम असाच निथळत यावा

अस्मानाला असा चढावा कैफ सात रंगांचा
मावळतीला चंद्र झुकावा जरा फिकट अंगाचा
हळव्या पानांतून मोहरत मोहक गंध फुलावा

भरून यावा कंठ खगांचा आणि फुटावे गाणे
व्हावी उन्मन कुणी कोकिळा त्यांच्या मधूर स्वराने
हुंकारातुन असा ओघळत शब्द प्रीतिचा यावा

प्रशांततेवर कुणी स्मिताची रेघ अशी रेखावी
मिठीतले क्षण दिठीत टिपण्या तू मजजवळ असावी
लाजलाजुनी असा फुलोरा वेलीवर लहरावा

झुळझुळणार्‍या निर्झरिणीची चरणगती तू घ्यावी
मला पाहण्या तुझी लोचने अशीच झुरत असावी
तव अधरांतिल मरंद माझ्या ओठांवर उतरावा