आधी हाताला चटके तेव्हां मिळते भाकर !
अरे, संसार संसार, खोटा कधी म्हणू नये
राउळाच्या कळसाला लोटा कधी म्हणू नये
अरे, संसार संसार, नाही रडनं, कुढनं
येड्या, गळ्यातला हार, म्हणू नको रे लोढणं !
अरे, संसार संसार, दोन जिवांचा विचार
देतो सुखाला नकार आणि दुःखाला होकार
गीत | - | बहिणाबाई चौधरी |
संगीत | - | वसंत पवार |
स्वर | - | सुमन कल्याणपूर |
चित्रपट | - | मानिनी (१९६१) |
राग | - | पिलू |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
कयस | - | कळस. |
खिरा | - | काकडीची एक जात. |
गयातला | - | गळ्यातला. |
जोजार | - | संसाराचा धबडगा. |
भिमफूल | - | बिब्ब्याला आलेले गोड फळ. |
भिलावा | - | बिब्बा. |
मदार | - | विश्वास. |
मियते | - | मिळते. |
राऊळ | - | देऊळ. |
अरे, संसार संसार
जसा तावा चुल्ह्यावर
आधी हाताले चटके
तव्हा मियते भाकर !
अरे, संसार संसार
खोटा कधी म्हनू नही
राऊळाच्या कायसाले
लोटा कधी म्हनू नही
अरे, संसार संसार
नही रडनं कुढनं
येड्या, गयातला हार
म्हनू नको रे लोढनं !
अरे, संसार संसार
खिरा येलावर्हे तोड
एका तोंडामधी कडू
बाकी सर्वा लागे गोड
अरे, संसार संसार
म्हनू नको रे भीलावा
त्याले गोड भीमफूलं
मधी गोडंब्याचा ठेवा
देखा संसार संसार
शेंग वरतून काटे
अरे, वरतून काटे
मधी चिक्ने सागरगोटे !
ऐका, संसार संसार
दोन्ही जिवाचा इचार
देतो दु:खाले होकार
अन् सुखाले नकार
देखा संसार संसार
दोन्ही जिवाचा सुधार
कधी नगद उधार
सुखदु:खाचा बेपार !
अरे, संसार संसार
असा मोठा जादूगार
माझ्या जिवाचा मंतर
त्याच्यावरती मदार
असा संसार संसार
आधी देवाचा ईसार
माझ्या दैवाचा जोजार
मंग जिवाचा आधार !
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.