A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
अंतरीच्या गूढ गर्भीं

अंतरीच्या गूढ गर्भीं एकदां जें वाटलें !
एकदां जें वाटलें तें प्रेम आतां आटलें !

दूर सोनेरी सुखाचे पाहिले आभास मीं, तूं :
रंगलें आभाळ पूर्वीं : तेंच आतां फाटलें !

एकदां ज्यांतून मागें सूर संवादी निघाले
वंचनेनें तोडले ते स्‍नेहतंतू आंतले !

शेवटीं मंदावलेल्या वादळी वार्‍याप्रमाणें
राहणें झालें दिवाणें, गीत गाणें कोठलें !
गीत - ना. घ. देशपांडे
संगीत - राम फाटक
स्वराविष्कार- सुधीर फडके
जी. एन्‌. जोशी
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
गीत प्रकार - भावगीत, कविता
  
टीप -
• काव्य रचना- १९३४.
• स्वर- सुधीर फडके, संगीत- राम फाटक.
• स्वर- जी. एन्‌. जोशी, संगीत- जी. एन्‌. जोशी.
वंचना - फसवणूक.
संपूर्ण कविता

अंतराच्या गूढ गर्भीं एकदां जें वाटलें गऽ !
एकदां जें वाटलें तें प्रेम आतां आटलें गऽ !

दूर सोनेरी सुखाचे पाहिले आभास मीं, तू :
रंगलें आभाळ पूर्वीं : तेंच आतां फाटलें गऽ !

चांदण्या रात्रींत मागें हिंडलों एकत्र दोघें :
चंद्रिकेनें थाटलें जें तें तमानें दाटलें गऽ !

एकदां जी दो थडीनें वाहिली होती, सखे, त्या
जान्हवीचें शुद्ध पाणी संशयानें बाटलें गऽ !

एकदां ज्यांतून मागें सूर संवादी निघाले
वंचनेनें तोडले ते स्‍नेहतंतू आंतले गऽ !

शेवटीं मंदावलेल्या वादळी वार्‍याप्रमाणें
राहणें झालें दिवाणें, गीत गाणें कोठलें गऽ !

यातना दु:खातली अन्‌ चेतना गेली सुखाची :
झाकल्या नेत्रांत आता अश्रुबिंदू गोठले गऽ

  संपूर्ण कविता / मूळ रचना

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  सुधीर फडके
  जी. एन्‌. जोशी