A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
आनंद सांगूं किती सखे ग

आनंद सांगूं किती सखे ग आनंद सांगू किती
सीतावल्लभ उद्यां व्हायचे राम आयोध्यापति

सिंहासनिं श्रीराघव बसतां
वामांगी तूं बसशील सीता
जरा गर्विता, जरा लज्जिता
राजभूषणां भूषवील ही, कमनिय तव आकृति

गुरुजन मुनिजन समीप येतिल
सप्त नद्यांचीं जलें शिंपतिल
उभय कुळें मग कृतार्थ होतिल
मेघाहुनिही उच्चरवांनी, झडतिल गे नौबति

भर्त्यासम तुज जनीं मान्यता
राज्ञीपद गे तुला लाभतां
पुत्राविण तूं होशील माता
अखिल प्रजेच्या मातृपदाची, करणे तुज स्वीकृति

तुझ्याच अंकित होइल धरणी
कन्या होइल मातृस्वामिनी
भाग्य भोगिलें असलें कोणीं?
फळाफुलांनी बहरुनि राहिल, सदा माउली क्षिति

पतितपावन रामासंगें
पतितपावना तूंही सुभगे
पृथ्वीवर या स्वर्गसौख्य घे
त्रिलोकांमधे भरुन राहुं दे, तुझ्या यशाची द्युति

महाराणि तूं, आम्ही दासी
लीन सारख्या तव चरणांसी
कधी कोणती आज्ञा देसी
तुझिया चरणीं मग्‍न राहुं दे, सदा आमुची मति

विनोद नच हा, हीच अपेक्षा
तव भाग्याला नुरोत कक्षा
देवदेवता करोत रक्षा
दृष्ट न लागो आमुचीच गे, तुझिया भाग्याप्रति

ओळखिचे बघ आले पदरव
सांवलींत गे दिसलें सौष्ठव
तुला भेटण्या येती राघव
बालिश नयनीं तुझ्या येइ कां, लज्जेला जागृति?
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वराविष्कार- सुधीर फडके
∙ आकाशवाणी प्रथम प्रसारण
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
राग - मिश्र काफी
गीत प्रकार - गीतरामायण, राम निरंजन
  
टीप -
• गीतरामायण.
  • प्रथम प्रसारण दिनांक- २४/६/१९५५
  • आकाशवाणीवरील प्रथम प्रसारण स्वर- सुमन माटे, उषा अत्रे, जानकी अय्यर, योगिनी जोगळेकर, सौ. जोग.
क्षिति - पृथ्वी.
द्युति - प्रकाश.
नौबत - मोठा नगारा.
भर्तार (भर्ता) - नवरा, पती / स्वामी.
मति - बुद्धी / विचार.
रव - आवाज.
राज्ञी - राणी.
वल्लभ - पती / प्रिय.
वामांगी - डाव्या (वाम) बाजूस बसणारी ती- पत्‍नी.
सुभगा - भाग्यशाली स्‍त्री.
सौष्ठव - सौंदर्य / बांधेसूद.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  सुधीर फडके
  आकाशवाणी प्रथम प्रसारण