हिंदुस्थानला अनेक मोठ्या क्रांतिकारकांची परंपरा लाभलेली आहे. त्यातलंच एक नाव स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. असामान्य प्रतिभेचे धनी असलेल्या सावरकरांविषयी, त्यांच्याच शब्दात सांगायचं तर ते वृत्तीने कवी आणि कलावंत होते, पण परिस्थितीने त्यांना राजकारणी पुरुष बनवले होते.
कवी कविता का लिहितो, यावर अनेक मतमतांतरे आहेत; पण काव्य हा कवीच्या रोजच्या व्यवहाराचाच एक भाग आहे. शब्दांच्या माध्यमाने विशिष्ट प्रकारे व्यक्त होणं, हे कवींसाठी श्वास घेणं, पाणी पिणं इतकं स्वाभाविक असतं. तो त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग असतो. काव्यातून वाचक काय घेतो, ही गोष्ट वाचकसापेक्ष असते. यश, आनंद, उपदेश, समाधान, स्वप्नरंजन हा कवीला होणारा अनुषंगिक लाभ आहे.
वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी सावरकरांनी महाकवी होण्याची इच्छा बोलून दाखवली होती. मोरोपंत, वामन पंडित, भवभूती, श्रीधर, होमर, मिल्टन, शेले यांच्या काव्याचे संस्कार त्यांच्यावर झाले.
लहानपणी बहीण आणि तिच्या मैत्रिणी जेव्हा ओव्यांच्या भेंड्या खेळायच्या, त्या वेळी विनायकरावांना आपल्या बाजूने घेण्यासाठी सगळ्या मुलींची धडपड असायची. कारणही स्वाभाविक होतं. सावरकरांना मराठ्यांचा इतिहास मुखोद्गत होता आणि काव्यप्रतिभाही विलक्षण होती. खंड पडू लागला की सावरकर तिथल्या तिथे ओव्या रचून अखंड म्हणत राहायचे.
सावरकरांनी मराठी साहित्याची जितकी सेवा केली, तेवढी क्वचितच कोणी केली असेल. निबंध, कादंबरी, कथा, लेख, नाटक, काव्य आणि काव्यामध्ये आख्यान, पोवाडे, फटके, लावणी, भावकविता, सुनीत, स्तवन, आरत्या अशा सर्वच काव्यप्रकारांना सहजी हाताळलेले आहे. वा. गो. मायदेव यांच्या मते सावरकरांचा काव्यसंभार संख्या दहा हजार ४८८ इतका आहे. एका मर्यादित आयुष्यात एका माणसांकडून इतकं साहित्य निर्माण होणं ही जगाच्या इतिहासात घडलेली दुर्मिळ गोष्ट आहे.
सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाला सहस्र पैलू आहेत. सावरकर आपल्याला क्रांतिकारक, समाजसेवक, वक्ता, तत्त्वज्ञानी, विज्ञाननिष्ठ म्हणून माहीत आहेत. त्यांच्या काव्यामध्ये त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब पडतं आणि ओघाने आपल्याला ज्ञात असलेले उपरोक्त सावरकर दिसतात. सावरकरांच्या काव्यात आत्माविष्कार प्रकर्षाने जाणवतो. काव्य विषयाची निवड, भाषा, उपमा, उत्प्रेक्षा, पात्र, रसाविष्कार यामध्ये व्यक्तिमत्त्वाचं प्रकटीकरण होत असतं. ‘कमला’ काव्यातला मुकुंद आणि मुकुल यांच्यातील संवाद असो, किंवा
शैशवी दूधभाताचा घास लावूनि लोणचे
ताटलीतूनी जो देई आई त्यांस कोणचे
मिष्ट पक्वान्न हो लागे आयुष्यात पुन्हा? तसे
या गोमंतक काव्यात व्यक्त झालेली आईबद्दलची गोड आठवण आत्माविष्कार दाखवतात.
प्रा. वसंत नारायण नाईक म्हणतात, ‘‘सावरकरांच्या कवितांनी त्यांना थोर पद दिले नसून, त्यांच्या इतर थोर कार्याच्या प्रकाशात त्यांचे काव्य थोर दिसते. हा दृष्टिकोन कायम ठेवून आपण त्यांचे काव्य वाचले पाहिजे.’’ ते जगले ते आयुष्यसुद्धा सामान्य थोडंच होतं. यातच त्यांच्या काव्याचं असामान्यत्व दिसतं. त्यांचे समकालीन असलेले क्रांतिकारक अथवा साहित्यिक यांच्याशी तुलना करता स्वातंत्र्यासाठी उत्कटपणे लिहिणारे ते एकटेच होते. आजही ‘सागरा प्राण तळमळला’ या ओळी ऐकल्या तरी मन अस्वस्थ झाल्याशिवाय राहत नाही. याला काव्य प्रतिभेशिवाय काय म्हणता येईल !
प्रा. मालशे यांनी सावरकरांच्या काव्याचे चार भागात वर्गीकरण केले आहे. काळानुरूप आणि परिस्थितीप्रमाणे त्यांच्या काव्यावर कसा फरक पडत गेला हे कळतं. पहिला नाशिक-पुण्याचा विद्यालयीन कालखंड. ज्यात त्यांचे काव्य कवण स्वरूपातले आहे. दुसरा कालखंड लंडनचा, ज्यात त्यांचे काव्य भावनाप्रधान झाले आहे. तिसरा कालखंड बंदिशालेचा जेव्हा त्यांची काव्यदृष्टी अंतर्मुख झाली आहे. चौथा कालखंड रत्नागिरीचा जेव्हा त्यांची कविता प्रचारकी थाटाची झाली आहे.
सावरकरांच्या काव्यामध्ये प्रकर्षाने जाणवणारा गुण म्हणजे पराकोटीचा आशावाद. परदेशी काव्याशी तुलना करून आपल्याकडे निपजणारं साहित्य हे कसं दुय्यम आहे, असा समीक्षकांचा पूर्वापार चालत असलेला प्रघात आहे. याला कुठेतरी आळा बसायला हवाय. उदाहरणादाखल लॉर्ड बायरन यांची ‘प्रिसनर्स ऑफ चिलोन’ ही कविता. यामध्ये युद्ध कैद्यांना एका काळकोठडीत ठेवण्यात आलं होतं. निवेदक कोठडीत घृणास्पद आयुष्याचं वर्णन करतो. त्यांच्या छळाचं वर्णन करतो. त्याच्या मित्रांना, भावांना मरताना पाहतो. एक दिवस त्याची सुटका होते; पण त्याला त्या अपरिचित जगात जायचं नसतं. त्याला स्वातंत्र्य नको असतं. या उलट सावरकर लिहितात-
अनादि मी अनंत मी, अवध्य मी भला
मारिल रिपु जगति असा कवण जन्माला
किंवा
याहुनिहि भयद असे छळ सहेनची
परि झटेन, जीवनांतिही झटेनचि
करण्यासी ही विमुक्त मातृभू पुन्हा
व्यक्तिगत आयुष्यात आलेलं दुःख, अपमान, मन:स्ताप, कष्ट याचे हलाहल पचवून अंतःकरणात सतत असणारा आशावाद दिसतो.
स्वजनांबद्दल असणारं प्रेमसुद्धा त्यांच्या काव्यात दिसतं. दोन्ही बंधू, आजोळ, आई-बाबा, पुत्र प्रभाकर, येसूवहिनी मित्रमेळ्यातील सुहृदजन यांचा उल्लेख त्यांच्या काव्यात पाहायला मिळतो. स्वजनांच्या भेटीसाठी तलमळणारा कुटुंबवत्सल कवी आपल्याला दिसतो. त्यांची कुटुंबाची कल्पना एवढ्यापुरतीच मर्यादित नव्हती. ‘वसुधैव कुटुंबकम्’ अशी व्यापक होती. याचा प्रत्यय ‘मला देवाचे दर्शन घेऊ द्या’ ही अस्पृश्यांचे दुःख मांडणारी कविता असो किंवा ‘बालविधवा दुःस्थिती कथन’ ही कविता असो, त्यांची मानवतावादी दृष्टी दर्शवतात.
ती आम्रवृक्ष वत्सलता । रे
नवकुसुमयुता त्या सुलता । रे
तो बालगुलाबही आता । रे
फुलबाग मला हाय पारखा झाला
मात्र त्यांच्या या मायाळू स्वभावावर कर्तव्यविचाराने मात केलेली पदोपदी दिसते. कमला काव्याला या कर्तव्यभावनेने एका उंचीवर नेऊन ठेवले आहे. त्यांच्या काव्याची प्रेरणा ‘मातृभूमी प्रेम’ हीच आहे. या मातृभूमीच्या दास्य विमोचनासाठी पेटलेल्या यज्ञात आपल्या आयुष्याची समिधा त्यांनी अर्पण केली; परंतु हा ‘त्याग’ नव्हता. ते होतं ‘समर्पण’ ! कारण त्याग हा नेहमीच स्वेच्छेने होत नाही.
तुजसाठी मरण ते जनन
तुजवीण जनन ते मरण
तुज सकल चराचर शरण
भारतभूमिला दृढालिंगना कधि देशिल वरदे?
ही स्वातंत्र्यनिष्ठा काव्याचं आणि त्यांच्या जगण्याचंसुद्धा प्रयोजन होती.
कवी म्हटलं की, कवी वास्तवात जगणारा नसतो, तो स्वप्नरंजन करण्यात मग्न असतो. असं म्हणतात की, "Poet, lovers and lunatics are idlers." परंतु सावरकर वास्तवात राहणारे कवी असले तरी द्रष्टे होते. भ. श्री. पंडित यांच्या भाषेत सांगायचं झालं तर "त्यांच्या काव्यात निव्वळ कल्पनेचे इमले नाहीत, प्रत्यक्षानुभवाचे रसरशीत अंगार आहेत." त्यांच्या काव्याची भाषाही त्यांच्या व्यक्तिमत्त्वासारखी तेजःपुंज, ओजस्वी आहे. साधारणपणे शृंगार रसाला रसराज म्हटलं जातं. मात्र सावरकरांची कविता ही वीररसाने ओतप्रोत भरलेली आहे. कमला काव्यात त्यांचा अल्पपरिचित असलेला मृदू कोमल स्वभाव दिसतो. लेखनाचं साहित्य उपलब्ध नसताना, घायपाताच्या काट्याने अंदमानात कोठडीच्या भिंतीवर लिहिलेलं; स्वतः मुखोद्गत करून इतर राजकीय कैद्यांकडूनही पाठ करून तुरुंगाबाहेर पाठवून पुढे ते प्रकाशात आणणं, असा विलक्षण इतिहास, नाट्य लाभलेलं जगाच्या इतिहसातील हे एकमेव काव्य असेल. मात्र या काव्याचा शेवटसुद्धा हौतात्म्य वृत्ती आणि स्वातंत्र्यनिष्ठेने होतो. केवळ या एका काव्याची चरणसंख्या ८८० इतकी आहे. महाकाव्य रचण्याचा मानस असला, तरी परिस्थितीमुळेच केवळ हे खंडकाव्य झाले. त्यांची प्रतिभा ही महाकवीची होती, यात वादच नाही. ‘महासागर’, ‘सप्तर्षी’सारख्या कवितेत त्यांचं तत्त्वज्ञान दिसतं. त्यांची कल्पनेची विद्वत्तेची झेप बघून दिपून जायला होतं.
भाषाशुद्धीसाठी सावरकर आग्रही होते. काव्यामध्ये परकीय शब्द वापरायचे ते टाळत. संस्कृतप्रचुरता हा त्यांच्या काव्याचा गुण आणि दोष दोन्ही म्हणता येईल.
सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाची तुलना ही पंचमहाभूतांबरोबर करावीशी वाटते. कारण यापेक्षा विशाल काही असूच शकत नाही. सूर्याप्रमाणे तेजस्वी, भूमीप्रमाणे सहनशीलता, जलाप्रमाणे निर्मळता-वात्सल्यता, वायूप्रमाणे आवेग आणि अवकाशाची विशालता आणि गूढता. एखाद्याच्या व्यक्तिमत्त्वाचे एक किंवा दोन गुण अधिक प्रकर्षाने प्रकट होत असतात. सावरकर मात्र याला अपवाद म्हणावे लागतील. त्यांच्यातले सगळेच गुण हे उत्कटपणे प्रकट झाले आहेत आणि हे परमेश्वराच्या बाबतीत शक्य आहे. माझ्या या वाक्यावर स्वतः सावरकरांनी आक्षेप घेतला असता, मात्र हे असामान्य नाही. आपल्याकडे असामान्यत्व परमेश्वराच्या कल्पनेत लोक करतात. परमेश्वराला मनुष्यदेहात दुःखभोग चुकले नाहीत, तसेच सावरकरांनासुद्धा; मात्र त्या परिस्थितीत ते कसे वागले यामुळे सावरकर ‘सावरकर’ ठरतात !
(संपादित)
अश्विनी जांभेकर पितळे
(लेखिका सावरकर साहित्याच्या अभ्यासक असून, विविध माध्यमात लिहितात.)
सौजन्य- दै. सकाळ (२६ फेब्रुवारी २०२२)
(Referenced page was accessed on 30 April 2024)
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
इतर संदर्भ लेख