A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
अखेरचे येतिल माझ्या

अखेरचे येतिल माझ्या हेच शब्द ओठी
लाख चुका असतिल केल्या, केली पण प्रीती

इथे सुरू होण्याआधी संपते कहाणी
साक्षीला केवळ उरते डोळ्यांतिल पाणी
जखम उरी होते ज्यांच्या तेच गीत गाती

सर्व बंध तोडुनि जेव्हा नदी धुंद धावे
मीलन वा मरण पुढे हे तिला नसे ठावे
एकदाच आभाळाला अशी भिडे माती

गंध दूर ज्याचा आणिक जवळ मात्र काटे
असे फूल प्रीती म्हणजे कधी हाय वाटे
तरी गंध धुंडित धावे जीव तुझ्यासाठी

आर्त गीत आले जर हे कधी तुझ्या कानी
गुज अंतरीचे कथिले तुला या स्वरांनी
डोळ्यांतून माझ्यासाठी लाव दोन ज्योती