'कुब्जा' ही इंदिरा संतांची एक सुरेख जमलेली कविता आहे. तिला एक चांगल्या गीताचाही आकार आपोआप प्राप्त झाल्याने तिचे सौंदर्य द्विगुणित झाले आहे.
कवितेच्या पहिल्या दोन ओळीत कृष्णाच्या प्रेमक्रीडेशी अविभाज्यपणे निगडित असणारे 'राधा' आणि 'गोकुळ' हे दोन्ही संदर्भ नाकारलेले आहेत. वेळही भल्या पहाटेची 'अवेळ' आहे. त्यामुळेच जिला कृष्णाच्या प्रेमाचा कण किंवा क्षणही प्राप्त होणे अशक्य वाटत असते अशी कुब्जा आपले तनमन विसरून प्रेमाने मोहरून येऊ शकते. मावळतीवरील केशरी चंद्र आणि भोवतीचा भणभण पहाटवारा तिला अधिकाअधिक प्रीतिसन्मुख करतात. त्यामुळेच पैलतीरावर घुमणारा मंजुळ पावा ती अर्ध्या पाण्यामध्ये उभी राहून ऐकते. तो ऐकत असतानाच तिची प्रीतिसमाधी लागते. ('तिथेच टाकून अपुले तनमन' - म्हणजे समाधीअवस्था.) या समाधीअवस्थेत अवघे विश्वच ओठाला लावून कुब्जा तो मुरलीचा रव पिते. ही प्रीतिसमाधी भंग पावत असतानाही 'कृष्णाच्या मुरलीचे हे ध्वनी खास आपल्याचसाठी आहेत' अशी भावना होऊन प्रीतीमधील कृतकृत्यतेचे एक समाधान कुब्जा अनुभवत असते.
कुरूपतेला दुर्लभ असलेल्या सौंदर्यप्राप्तीचा क्षण येथे कवयित्रीने टिपलेला आहे. हा क्षण सर्वस्वाने अनुभवता यावा म्हणून कुरूपताही आपले 'तनमन' टाकले आणि व्यापक होऊन तो क्षण स्वीकारण्यासाठी धडपडते, असा एक वेगळाच अनुभव कवयित्री येथे व्यक्त करीत आहे. यादृष्टीने -
विश्वच अवघे ओठां लावुन
कुब्जा प्याली तो मुरलीरव
ह्या ओळींतून सूचित होणारा भावाशय मद्दाम निरीक्षण करावा असाच आहे. कृष्णाच्या मुरलीतून जे ध्वनी विश्वात वितरले गेलेत, त्यातील एकही ध्वनीवलय गमावले जाऊ नये, याची जणू एक दक्षता घेण्यासाठीच ही कुब्जा अवघे विश्व ओठाला लावीत आहे.
राधा जागी नाही, गोकुळही जागे नाही आणि कोणत्याही प्रकारच्या कृष्णसंलग्न गोष्टीचा अडथळा येणार नाही अशी 'अवेळ' असल्याने कृष्णप्रीतीचे हे क्षणदान कुब्जा पूर्ण समाधीनिशी आत्मसात करू शकत आहे. शिवाय कृष्णप्रीतीचे इतर सर्व घटक व संदर्भ अनुपस्थित असल्याच्या प्रकटअप्रकट जाणिवेमुळेच की काय कृष्णप्रीतीची ही अभिव्यक्ती फक्त आपल्यासाठी, केवळ आपल्या स्वत:साठी आहे, ही भावनाही एकाच वेळी तिला सुख देणारी व तृप्त करणारी आहे.
(संपादित)
डॉ. दत्तात्रय पुंडे, डॉ. स्नेहल तावरे
त्रिदल- बालकवी, कुसुमाग्रज आणि इंदिरा संत यांच्या निवडक कविता
सौजन्य- स्नेहवर्धन पब्लिशिंग हाऊस, पुणे.
* ही लेखकांची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
इतर संदर्भ लेख
अगदी पहाटेच नदीवर आली आहे. अजून तर पुरतं उजाडलेलंही नाही. अंधार आहेच. मावळतीला मधुर केशरी चंद्र अजून झळकतो आहे. वारा भरारा वाहतो आहे. नदीचं पाणी गार, सावळं.
ती कदाचित रोजच अशी येत असेल. अशीच. इतक्या पहाटे. किंवा कदाचित आजच कशी कोण जाणे, लवकर जागी झाली आहे आणि नदीवर आली आहे. ती तिची स्नानाची वेळ. पाण्यात उतरली आहे ती. कुणीच नाही अजून नदीवर आलेलं. म्हणजे माणूस असं कुणीच नाही. सगळं निरंजन आहे. फक्त ती, नदी, वारा आणि चंद्र..
आणि अचानक नदीपलीकडच्या तीराला बासरीचे स्वर उमटताहेत. अशा अवेळी? का? कसं घडलं आहे हे? कुणासाठी हे नवल? भोवती तर कुणीच नाही जागं. ऐलपैल सगळं शांत आहे. माणसांचं जग अजून जागं व्हायचं आहे. ती गजबज, ती वर्दळ सुरू व्हायला अवकाश आहे अजून. मग हे सूर आता कसे? कुणासाठी?
अजून नाही जागे गोकुळ
अशा अवेळी पैलतिरावर
आज घुमे का पावा मंजूळ
म्हणजे ही जी स्वत:शीच बोलते आहे ती राधा नाही? नाही. जी कुणी आहे, तिनं नदीच्या अलिकडच्या तीरावरून पलिकडच्या तीरावर उमटणारे ते बासरीचे सूर ऐकले आहेत. ती ओळखते त्या सुरांना. विलक्षण संमोहित करणार्या त्या सुरांचं उगमस्थान कोणतं आहे, हे माहीत आहे तिला. कदाचित गोकुळातल्या रासाच्या वेळी तिनं ते ऐकले असतील आणि गोपींना वेड लावणारी त्या सुरांची जादू तिला समजली असेल. किंवा कदाचित प्रत्यक्ष ते सूर कधी ऐकलेही नसतील तिनं पूर्वी, पण त्यांच्याविषयी, काळजाला एकाच वेळी दुखवणार्या आणि सुखवणार्या त्यांच्या शक्तीविषयी, विलक्षण बेभान करण्याच्या त्यांच्या किमयेविषयी तिनं ऐकलं असेल खूप काही. कसं असेल ते इंद्रजाल, याची उत्कंठाही कदाचित तिच्या मनात सतत असेल. एक आस असेल, एक ध्यास असेल- इतका, की प्रथमच ऐकले तरी अनोळखी वाटण्यापूर्वीच तिनं ते सूर ओळखले असतील.
पण ते अशा अवेळी कसे उमटले? राधा तर झोपलेलीच आहे अजून. त्या सुरांची पहिली दावेदार तीच तर आहे. तिचा हक्क आहे त्यांच्यावर. ती जागी नाही अजून. त्या सुरांवर कायमचं लोभावलेलं गोकुळही निजलेलंच आहे. तरीही हे सूर कुणासाठी उमटत असतील? ते ऐकताक्षणी तिला पहिली आठवण राधेची झाली आहे. कृष्ण तर सगळ्या गोपींचा आहे; सगळ्या गोपाळांचाही आहे. गोकुळाचं त्याच्यावर आणि त्याचं गोकुळावर प्रेमच आहे. पण सगळ्यात आधी आहे, ती राधा आहे. सगळ्यांना सगळं देऊनही जिच्यासाठी पुन्हा सगळं नवीन होऊन उरतं आहे आणि ते कधी सरतं होणारं नाहीच आहे, ते प्रेम कृष्णानं राधेवर केलं आहे.
हे माहीत आहे त्या कुणा एकीला. म्हणून तर ती आश्चर्यचकित झाली आहे. थक्क होऊन विचार करते आहे की, अजून जर राधा जागी नाही, गोकुळ जागं नाही, तर मग हे सूर कसे उमटले असतील? कुणासाठी?
मावळतीवर चंद्र केशरी
पहाटवारा भवती भणभण
अर्ध्या पाण्यामधे उभी ती
तिथेच टाकुन अपुले तनमन
मग हळूहळू नवल मावळलं आहे. प्रश्न विरले आहेत. एक अद्भूत संमोहन निर्माण झाले आहे. त्या सुरांनी तिला भरून-भारून टाकलं आहे. पाण्यात उभी आहे ती. स्तब्ध. शांत. तृप्तही. वर मावळतीच्या कठड्याशी केशरी मधुर चंद्र आहे. वारा अंगावरून भरारा वाहतो आहे आणि ती उभी आहे अर्ध्या पाण्यात. स्वत:ला विसरून. देहाचं-आपल्या मंत्रविद्ध अवस्थेचं भान तिला नाहीच. हळूहळू इतरही सगळं ती विसरली आहे. जाणिवेच्या प्रदेशातून नेणिवेच्या धूसर, तरलतेत तरळते आहे.
विश्वच अवघे ओठा लावुन
कुब्जा प्याली तो मुरलीरव
डोळ्यांमधुनी थेंब सुखाचे :
'हे माझ्यास्तव, हे माझ्यास्तव'..
ती कुब्जा आहे. तिला एका क्षणी लख्ख कळलं आहे की, ती बासरी आत्ता त्या क्षणी तरी फक्त तिच्यासाठीच वाजते आहे. ती राधेसाठी नाही. ती गोकुळासाठीही नाही. त्या एका पहाटवेळेवर त्या स्वरांनी फक्त तिच्या नावाची मुद्रा उमटवली आहे.
इंदिरा संतांची ही 'कुब्जा' अगदी पूर्णपणे इंदिराबाईंचीच आहे. भागवतातल्या कुब्जेशी तिचं नातं अगदी पुसटसं आहे. भागवतानं जशी राधा जन्माला घातली, तशी त्रिवक्रा कुब्जाही आपल्या पुढे उभी केली आहे. तीन ठिकाणी वाकडी म्हणून त्रिवक्रा.
भागवताच्या दशमस्कंधात कृष्ण गोकुळ सोडून मथुरेला आला आहे. सोबत बलराम आहे. कंसाचा वध करण्यासाठी ते दोघे कुमार निघाले आहेत. वय अगदी तरुण कोवळं आहे. रूप अति लाघवी आहे. दोघं रस्त्यानं निघाले आहेत आणि वाटेत कंसाची त्रिवक्रा नावाची दासी त्यांना दिसते. चेहरा सुंदर आहे तिचा. खूप सुंदर, पण मान, छाती आणि कटी अशा तीन ठिकाणी ती वाकडी आहे. कुरुपतेची जाणीव कायमची मनात घेऊन ती वावरत असणार. उपेक्षितांचं एक वेगळंच जग असतं. तिथली आहे कुब्जा. कंसाची ती आवडती दासी आहे, कारण तिच्याइतकं उत्तम अनुलेपण दुसरं कुणी करू शकत नाही. केशर, कस्तुरी आणि गंधाची उटी कंसाला रोजच चढवण्याचं काम तिचं आहे आणि ती ते अगदी कुशलतेनं करते आहे. ती कंसाकडेच निघाली आहे आणि तिच्याजवळ अंगलेपणाचं सगळं साहित्य आहे.
कृष्णानं तिला पाहिलं आणि थांबवून तिची चौकशी केली. कंसाऐवजी ते लेपण तू आम्हाला करशील का? असं त्यानं विचारलं. कुब्जा सहज समर्पित झाली. कृष्ण, बलरामाला तिनं जवळची सुगंधी उटी लावली आणि तिच्यावर प्रसन्न होऊन कृष्णानं तिचे चवडे पायानं दाबून धरत दोन बोटांनी तिची हनुवटी वर उचलली आणि तिचं कुबड नाहीसं झालं. वाकुडपणा संपला. तिचा चेहरा सुंदर होताच. मनही सुंदर असलं पाहिजे. आता देहाच्या असुंदरपणाची उणीवही सरली.
कुब्जा कृष्णावर लोभावली असली तर नवल नाही. तिचं काम जसं कंसाला गंधलेपण करण्याचं होतं, तसं पांथस्थांना संतुष्ट करण्याचंही होतं. तिनं कृष्णाला तिच्या घरी येऊन आतिथ्य स्वीकारण्याची विनंती केली. 'माझं कार्य पुरं झाल्यावर मी अवश्य येईन !' कृष्णानं तिला आश्वासन दिलं आणि तो पुढे निघाला.
भागवतामधली त्रिवक्रेची हकीकत आहे, ती अशी एवढीच. तिच्या नावासकट याचा एक थोर आध्यात्मिक अन्वय लागू शकतो, पण आपण त्या गहनात उतरलो नाही तरी ही कुब्जा आपल्याला तिच्याबरोबर जाणिवेच्या एका गूढ प्रदेशात खेचत नेतेच. ती पांथांची विश्रांती होती. प्रवाशांचं समाधान करणारी तरुण मुलगी होती. कृष्णापूर्वी कितीतरी मुशाफिर तिच्या घरी आले असतील. कंसाची सेवा तर ती करत होतीच. त्या सगळ्यांच्या पलीकडे असलेला एक तरुण सुंदर मुलगा तिला कृष्णाच्या रुपानं भेटला. त्यानं तिच्याकडे मागणी केली ती फक्त उटीची. आणि बदल्यात त्यानं तिचं लौकिकातलं वाकडेपण घालवलं. तिच्या मनाला लागलेली त्या वाकडेपणाच्या जाणिवेची कसर दूर केली. तिला त्यानं एक निरोगी, सुंदर तरुण मुलीचं आयुष्य बहाल केलं. कुब्जा कृष्णाला मनानं अर्पण झाली असली तर नवल नाही.
इंदिराबाईंची कुब्जा ही भागवतातल्या कुब्जेपेक्षा वेगळी आहे. तिला मुळी कसली अपेक्षाच नाही कृष्णाकडून. तिच्यासाठी तो असेल, काळाच्या एका तुकडर्यात, एका बिंदूवर त्याला तिची आठवण असेल, हे माहीतही नाही तिला. स्वत:चं उणेपण आणि वाट्याला आलेला उपहास, उपेक्षा, हेलना- तिनं सगळं स्वीकारलेलंच असेल. पण अगदी अचानक, ध्यानीमनीही नसता तिच्यासाठी त्याच्या बासरीचे सूर उमटले. ते राधेसाठी नव्हते, गोकुळासाठी नव्हते. ते फक्त तिच्यासाठी होते. ती तृप्त झाली.
असं होतं कधी कधी. आपल्या साध्या, क्षुद्र इच्छांना, अगदी सामान्य अशा ध्यासांना ओढींना कधीतरी खूप मोठ्या गोष्टींचा स्पर्श होतो आणि मग जगणं बदलूनच जातं. इतका थोर असतो तो स्पर्श ! ती खूण इतकी थोर असते की, एकदा त्या स्पर्शाची, त्या खुणेची ओळख पटली की पूर्वीचं सगळंच बदलून जातं. नवीन होतं जगणं. शान्ताबाई शेळके यांच्या कवितेच्या ओळी आठवताहेत-
नेहमीच नाही पण, कधी असेही घडते
करकरीत वास्तवा जरीकिनार जडते
. . . .
नेहमीच नाही, पण कधीतरी असे होते
माती पदरी भरता रत्न हातामध्ये येते
जगाला कळो अथवा न कळो, कुब्जेला कळलं आहे. तिच्यासाठी जे होतं, ते तिनं तुडुंब स्वीकारलं आहे. त्या क्षणी इंदिराबाईंची कुब्जा तर तृप्त झालीच आहे, पण आपणही तृप्त झालो आहोत; कारण 'पांथस्थांची विश्रांती' ठरलेल्या भागवतातल्या कुब्जेची मागणी दूर सारून ही कुब्जा निरभिलाष समोर आली आहे. जिला काहीच मागायचं नाहीये, अशा एका साध्या, पण उत्कट मुलीच्या आयुष्याला एक दिव्य स्पर्श करून तिला उजळून टाकणार्या कृष्णाचंही एक निराळंच दर्शन आपल्याला झालं आहे. त्यानं तिला दिलं आहे, ते देहापलिकडचं आहे. ते निराकाराचं देणं आहे. तरलतेचं देणं आहे. अपार्थिवाचं देणं आहे. आपल्या जगन्नायकाच्या विराट भूमिकेतही लहानातल्या लहान माणसाला, उपेक्षित आणि एकाकी माणसाला जीवनसार्थकाचा क्षण भेटवण्याची सहज कृती करून जाणारा तो कृष्ण इंदिराबाईंच्या या कवितेत न दिसूनही कसा सारखा दिसून राहिला आहे !
(संपादित)
अरुणा ढेरे
सदर- कवितेच्या वाटेवर
सौजन्य- दै. लोकसत्ता (१३ जून, २००९)
(Referenced page was accessed on 15 December 2016)
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
इतर संदर्भ लेख