A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
अजि पुरवा ही हौस

अजि पुरवा ही हौस प्रियकरा, मातृपदीं तनु मम बसवा ॥

स्त्री जगाला स्त्रीच विधाता, होत नाहिं जरि माता,
विश्व-सुखीं विष कालवा ॥
गीत - कृ. प्र. खाडिलकर
संगीत - मास्टर कृष्णराव
स्वर- बालगंधर्व
नाटक - मेनका
ताल-त्रिताल
चाल-छिन छिनया
गीत प्रकार - नाट्यसंगीत
ऋग्वेदाच्या तिसर्‍या मंडळाचा ऋषि, इंद्रानें अन्‍न मागितलें असता इंद्राकडे मंत्र पाठवून इंद्राला संतुष्ट करणारा ऋषि, घृताची अप्सरेला बळी पडणारा ऋषि, दुसरें जग उत्पन्‍न करण्याचा प्रयत्‍न करणारा ऋषि, गायत्री मंत्राचा द्रष्टा ऋषि, अशा रीतीनें ज्याची महती वेदांतून गाइलेली आहे, तो विश्वामित्र आणि हिंदुस्थानाला 'भरतखंड' हें नांव ज्यामुळें प्राप्त झाले त्या भारतवंशाला जन्म देणार्‍या शकुंतलेची आई मेनका ह्यांचा संबंध कसा जडला, ह्याचे वर्णन मेनकेच्या नेहमींच्या आख्यानांत योग्य फेरफार करून ह्या नाटकांत केलें आहे.

पूर्वीच्या संगीत नाटकांच्या वेळी कै. भास्करबुवा बखले यांची मदत नाटकांतील चालींसंबंधाने फार झाली; ह्या नाटकाच्या वेळीं तसा योग नाहीं, ह्याबद्दल फार वाईट वाटतें. कै. भास्करबुवांचे नामांकित शिष्य 'गंधर्व नाटक मंडळी'तील रा. कृष्णराव फुलंब्रीकर व रा. नारायणराव राजहंस ऊर्फ बालगंधर्व ह्यांनी कै. भास्करबुवांच्याच घराण्यांतील चाली ह्याहि नाटकास दिल्या आहेत. नाटकांतील चाली दिल्याबद्दल व नाटक बसवितांना फार मेहनत घेतल्याबद्दल 'गंधर्व नाटक मंडळी'चे मानावे तेवढे आभार कमीच होणार आहेत.
(संपादित)

कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर
दि. २२ एप्रिल १९२६
'संगीत मेनका' या नाटकाच्या पुस्तकाच्या प्रथमावृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर (प्रकाशक)

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.