A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
ऐसा महिमा प्रेमाचा

ऐसा महिमा । प्रेमाचा ।
मधुर भासला । खेळ सदा । प्रेमाचा ॥

प्रभु परि माझा । मग रुसतां ।
डाव उधळिला । सौख्याचा । प्रेमाचा ॥
गीत - वसंत शांताराम देसाई
संगीत - मास्टर कृष्णराव
स्वर- रतिलाल भावसार
नाटक - प्रेमसंन्यास
राग - पहाडी
ताल-केरवा
चाल-सखेरी बन्दाता हमरे
गीत प्रकार - नाट्यसंगीत
गडकर्‍यांनी लिहिलेल्या पहिल्या 'गर्वनिर्वाण' नाटकाची संहिता उपलब्ध नाही.

'किर्लोस्कर नाटक मंडळी'चा मुक्काम त्यावेळी नासिक येथे होता. १९०९ सालच्या डिसेंबर महिन्याची ती एकवीस तारीख होती. त्या रात्री होणारा देवलांच्या लोकप्रिय 'शारदा' नाटकाचा प्रयोग पाहण्यासाठी नासिक जिल्ह्याचे त्या वेळचे कलेक्टर जॅक्सनसाहेब हजर राहणार होते. जॅक्सनसाहेब आले आणि त्यांच्यासाठी राखून ठेवलेल्या आसनाकडे जाऊ लागले. इतक्यात हातात पिस्तुल घेतलेला एक तरुण पुढे सरसावला आणि त्याने जॅक्सनसाहेबांवर गोळ्या झाडल्या. एका क्षणात गतप्राण होऊन ते जमिनीवर कोसळले !
त्या तरुणाचे नाव अनंत कान्हेरे.

त्या घटनेशी 'किर्लोस्कर मंडळी'चा किंवा तिच्या घटकांचा कोणताही संबंध नव्हता. पण चौकशीची चक्रे फिरू लागली, जाबजबाब आणि झडत्या सुरू झाल्या !! राजद्रोही माणसांविरुद्ध आणि संस्थांविरुद्ध सरकारने शस्त्र उपसले. 'गर्वनिर्वाण' नाटकाचा राजद्रोहाशी संबंध नव्हता, परंतु हिरण्यकश्यपूच्या तोंडची काही वाक्ये एखाद्या उन्मत्त राज्यकर्त्याला शोभेशी होती. १९०७ साली 'महाराष्ट्र नाटक मंडळी'च्या रंगभूमीवर आलेले कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचे 'कीचकवध' हे नाटक राजद्रोहात्मक असून त्यावर बंदी घातली पाहिजे, असा प्रचार जोरात सुरू झालेला होता. नाटक आणि नाटककारांकडे सरकार वक्र दृष्टीने पाहत होते. न जाणो, 'गर्वनिर्वाण' नाटकातसुद्धा सरकारला राजद्रोह दिसेल या, भितीने गडकर्‍यांनी नाटकाच्या वह्या एके दिवशी नष्ट करून टाकल्या !!

जॅक्सनच्या खुनाच्या वेळेचे वादळ शांत झाल्यावर गडकर्‍यांनी पुन्हा 'गर्वनिर्वाण' नाटक लिहायला सुरुवात केली, परंतु त्याच वेळी (१९१०) कोल्हटकरांच्या नव्या 'प्रेमशोधन' नाटकाच्या तालमी 'किर्लोस्कर नाटक मंडळी'त सुरू होऊन 'गर्वनिर्वाण' बाजूला पडले. त्यामुळे आपले नाटक रंगभूमीवर येण्याचा योगच नाही, असा गडकर्‍यांचा समज होऊन, अशा रीतीने 'किर्लोस्कर नाटक मंडळी'त वेळ फुकट घालविण्यापेक्षा पुन्हा एकदा फर्ग्युसन कॉलेजात प्रवेश करण्याचे त्यांनी निश्चित केले.

'प्रेमसंन्यास' नाटकापूर्वी गडकर्‍यांनी केलेल्या गद्य लेखनात वाचकांचे लक्ष वेधले जाईल किंवा त्यांना चकित करेल, असे काहीही सापडणार नाही. 'वेड्यांचा बाजार' या नावाच्या त्यांच्या एका प्रहसनाचे दोन अंक 'रंगभूमी' मासिकात प्रसिद्ध झाले होते. ते स्फुट लेख लिहिणार्‍या लेखकानेच 'प्रेमसंन्यास' नाटक लिहिले आहे, हे एखाद्याला खरेसुद्धा वाटणार नाही. कल्पनाशक्तीचा स्वैर विहार, कल्पनेला शोभेशी भाषा लिहिण्याचे सामर्थ्य, प्रेक्षकांना बेभान करणारा बेफाम विनोद आणि त्यांना विस्मयचकित करणारे नाट्यप्रसंग ! परंतु या शक्तींचा उपयोग करून अभिजात नाटक निर्माण करण्याची सिद्धी अद्याप गडकर्‍यांना प्राप्त झालेली नव्हती. हिर्‍यांचा आणि माणकांचा विस्कळित पसारा आपल्याभोवती मांडून बसणार्‍या एखाद्या जवाहिर्‍यासारखे ते या नाटकात दिसतात.

गडकर्‍यांच्या लेखनातील या शक्तीचे दर्शन वाचकांना आणि प्रेक्षकांना प्रथम 'प्रेमसंन्यास' नाटकात घडले आणि हे काहीतरी निराळेच प्रकरण आहे, अशी त्यांची खात्री झाली; 'प्रेमसंन्यास' नाटक रंगभूमीवर येऊन त्याचे प्रयोग पाहिल्यानंतरच खर्‍याखुर्‍या अभिजात नाटकाचा मार्ग गडकर्‍यांना दिसला, आणि म्हणून, 'प्रेमसंन्यास' नाटकानंतरच्या 'पुण्यप्रभाव' नाटकाच्या अगदी पहिल्याच वाक्यात त्यांचा ईश्वर म्हणतो,
"माझ्या प्रेमसंन्यासाने मला हा पुण्यप्रभावाचा मार्ग दाखविला नसता तर माझे मन अजूनही त्या वेड्यांच्या बाजारातच भटकत राहिले असते."

'प्रेमसंन्यास' या गद्य नाटकाचा पहिला प्रयोग सुप्रसिद्ध 'महाराष्ट्र नाटक मंडळी'ने १७ फेब्रुवारी १९१२ रोजी मुंबई येथील गँट रोड विभागातील बाँम्बे थिएटरात केला. सुरुवातीच्या प्रयोगात त्रिंबकराव कारखानीस (जयंत), वामनराव पोतनीस (लीला) (त्या काळात स्त्री भूमिका पुरुष नटच करीत असत). यशवंतराव टिपणीस (विद्याधर), केशवराव दाते (सुशिला), त्रिंबकराव प्रधान (कमलाकर) आणि शिवरामपंत परांजपे (गोकुळ) अशी पात्र योजना होती. त्यानंतर 'महाराष्ट्र नाट्य मंडळी'त फाटाफूट होऊन यशवंतराव टिपणीस आणि त्रिंबकराव प्रधान वगैरे नट 'महाराष्ट्र नाटक मंडळी'तून बाहेर पडल्यामुळे पात्रयोजना बदलावी लागली. त्यापैकी केशवराव दाते (जयंत) आणि त्रिंबकराव कारखानीस (कमलाकर) हा महत्त्वाचा होता.

'प्रेमसंन्यास' हे नाटक संगीताचा साज धारण करून १९४० साली गंगाधर लोंढे यांच्या 'राजाराम संगीत मंडळी'च्या रंगभूमीवर आले. 'संगीत प्रेमसंन्यास' नाटकासाठी पद्यरचना वसंत शांताराम देसाई यांनी केली होती आणि पदासाठी चाली सुप्रसिद्ध गायक नट, कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर ऊर्फ मास्तर कृष्णराव यांनी दिल्या होत्या. 'राजाराम संगीत मंडळी'च्या नाटकांत गंगाधरपंत लोंढे (जयंत), मास्तर दुर्गाराम, केसरबाई बांदोडकर आणि मास्तर नरेश (लीला), चिंतामणराव कोल्हटकर (कमलाकर) अशी पात्रयोजना होती. सुप्रसिद्ध विनोदी नट दामुअण्णा मालवणकर हे काही काळ गोकुळची भूमिका करीत असत.

'प्रेमसंन्यास' नाटकातील निरनिराळ्या प्रमुख भूमिका निरनिराळ्या नटांनी चांगल्या केल्या असल्या, तरी संबंध नाटकावर छाप टाकणारी भूमिका एकच झाली- ती म्हणजे केशवराव दाते यांची जयंताची भूमिका. दाते यांच्या उज्‍ज्‍वल कारकिर्दीची सुरवात त्यांना या भूमिकेनेच करून दिली. कमलाकराच्या कसाबकरणीने भीषण बनलेल्या या नाटकात, दाते यांच्या जयंताच्या भूमिकेमुळे काव्यात्मता, सुसूत्रता, सौंदर्य आणि मार्दव निर्माण होऊन, गडकर्‍यांच्या मनातला पण शब्दावडंबरात दडलेला अर्थ प्रेक्षकांच्या पदरात पडत असे.
(संपादित)

वसंत शांताराम देसाई
'गडकर्‍यांची नाट्यसृष्टी' या वसंत शांताराम देसाई लिखित पुस्तकातून.
सौजन्य- सोमैया पब्लिकेशन्स प्रा. लि., मुंबई.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.