माझ्या धुळीचे शेवटी येथे किती कण राहिले?
हदयात विझला चंद्रमा.. नयनी न उरल्या तारका..
नाही म्हणायाला तुझे हे आपुलेपण राहिले !
होता न साधा एवढा जो शब्द मी तुजला दिला,
एकाच शब्दाला उभे आयुष्य तारण राहिले !
ते लोक होते वेगळे घाईत जे गेले पुढे..
मी मात्र थांबुन पाहतो- मागे कितीजण राहिले?
गीत | - | सुरेश भट |
संगीत | - | रवि दाते |
स्वर | - | सुरेश वाडकर |
गीत प्रकार | - | भावगीत |
तारण | - | अनामत / गहाण ठेवलेली वस्तू. |
मला असे वाटते की, जर खरोखर गझल हा काव्यप्रकार आवडला, जर आपण गझलच्या प्रेमात पडलो तरच माणसाने गझललेखनाकडे वळावे.
माझ्या गझलेत 'मकते' नाहीत. म्हणजे शेवटच्या शेरात कवीचे टोपणनाव नाही, असा एक आक्षेप घेतला जातो. गझलच्या शेवटच्या शेरात तखल्लुस (कवीचे टोपणनाव) घालूच नये, असा माझा दुराग्रह नाही. ज्याला जे योग्य वाटेल त्याने ते करावे. पण माझे म्हणणे एवढेच आहे की ज्या काळात छापखाने नव्हते, लाखोंच्या घरात खपणारी वृत्तपत्रे, मासिके व साप्ताहिके नव्हती, ज्या काळात बहुसंख्य लोक निरक्षर होते, त्या काळात 'मकता' अत्यावश्यक असायचा. त्यात कवीचा उल्लेख (टोपणनाव) आवश्यक असायचे, कारण तेव्हाही काव्यतस्करी व्हायची.
ह्या माझ्या शब्दांना काहीजण 'प्रवचन' म्हणून कदाचित हिणवतीलही. स्वत:कडे वडिलधारेपण घेऊन कुणाला उपदेश करण्याचा माझा इरादा नाही; पण संबंधितांना विचार करण्यास भाग पाडणे, हा काही उपदेश नाही.
शिवाय, मला पुन्हा नवे कोरेकरकरीत शरीर आणि आयुष्य मिळणार नाही. माझा पुनर्जन्मावर विश्वास नाही. माझ्यासाठी हीच अंतीम संधी आहे. कशाचाही भरोसा नाही. तेव्हा जगाला काही तरी देऊन जावे. आज मीच मला बजावत आहे-
आता जगायाचे असे माझे किती क्षण राहिले?
माझ्या धुळीचे शेवटी येथे किती कण राहिले?
(संपादित)
सुरेश भट
'सप्तरंग' या सुरेश भट यांच्या कवितासंग्रहाच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- साहित्य प्रसार केंद्र, नागपूर.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.