A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
आषाढाच्या पहिल्या दिवशी

आषाढाच्या पहिल्या दिवशी अवचित दिसशी मला
म्हणुनिया विनवित मेघा तुला

रामगिरीवर एक यक्ष मी
काळ कंठितो विरही कामी
कसा सांगु मी शाप भोगतो व्यथा जाळते मला
म्हणुनिया, विनवित मेघा तुला

स्वीकारी या कुटजफुलांते
ऐक प्रार्थना प्रसन्‍नचित्ते
स्वागत करितो प्रीतिवचाने प्रणयी हा पोळला
म्हणुनिया, विनवित मेघा तुला

तुला पाहुनी सुखासीनही
कातर होती, होती विरही
कथा काय मग कंठमिठीचा प्रिय ज्यांचा तुटला
म्हणुनिया, विनवित मेघा तुला

तप्तांचा तू असशी आश्रय
इंद्रसचिव तू, तू करुणामय
निरोप माझा घेउनी जाई अलकानगरीला
म्हणुनिया, विनवित मेघा तुला

प्रिया दूर मम तिला भेटशिल
मनी वाटते नाहि न म्हणशिल
विफल विनवणी सुजनी बरवी नको शठीं सफला
म्हणुनिया, विनवित मेघा तुला

कुठला घ्यावा मार्ग प्रथम तो
सांगुनि नंतर निरोप कथितो
दूत होऊनि पोचिव माझ्या दुःखी दयितेला
म्हणुनिया, विनवित मेघा तुला