साद देते मी तुला अन् तू मला पडसाद दे
जुळविता तार विणेच्या जुळविली आम्ही मने
प्रेमगीतांना प्रिया तू आगळे संगीत दे
चांदवेडे हृदय माझे ओढ घेई तुजकडे
विरही जो अंगार आहे गारवा तू त्यास दे
प्रीतीचे दोघे प्रवासी मार्गी येथे भेटलो
यौवनाच्या मंदिरी या चांदण्याचा स्पर्श दे
गीत | - | मधुकर जोशी |
संगीत | - | दशरथ पुजारी |
स्वर | - | सुमन कल्याणपूर |
राग | - | हंसध्वनी |
गीत प्रकार | - | भावगीत |
तुझे गाल गुलाबी का?
तुझे ओठ शराबी का?
या गीतातली गुलाबी-शराबी या शब्दांची सुंदरता मला कळत नव्हती असं नाही; पण मला आड पद्धतीने गायची सवय होती त्यामुळे त्या गाण्याला मला सरळसरळ चाल बांधता येईना. 'तुझे' या शब्दाला मी ज्या आलापीने गात होतो, ते काही एच.एम.व्ही.च्या लोकांना आवडलं नाही. त्यांनी सागितलं की 'दुसरी काहीतरी निराळी चाल लावा. तुमच्या या तानेमुळे शराबी-गुलाबीपणा नष्ट होतोय.' दुसरी चाल लावायला मला खूप प्रयत्न करावे लागले. साधी, सरळ चाल लावता यावी म्हणून मी तुकारामाच्या गाथेतील अभंगांना चाली लावण्याचा प्रयत्न केला. म्हणजे माझी सुरुवात तुकारामाच्या गाथेपासून झाली. गाथेपासून सुरुवात केली म्हणजे खूप पुण्य कमावलं असं समजलं जातं.
माझी चाल योग्य आहे की नाही, हे सांगणारी माणसं दुर्मिळ होती. मी गायलो की लोकांना बरं वाटायचं. "वा ! काय छान तान मारली !" मग त्या गाण्याचे शब्द जरी कळले नाहीत वा गडबडले तरी तान छान मारली याचंच त्यांना अप्रुप वाटायचं. पण माझ्यावर प्रेम करणार्या काही मित्रांनी शब्द कसे म्हणायचे, स्वरामध्ये कसे मांडायचे ते गाऊन दाखवलं व म्हणाले, "आमची स्टाइल घेऊ नका, तुमच्याच पद्धतीने म्हणा."
रागदारीचा अभ्यास असल्याने आणि नंतर शब्द, स्वर व ताल यांचा भरपूर विचार झाल्यानंतर शब्द-चाल कसे बरोबरीने जातात याचं एक उदाहरण देतो-
आस आहे अंतरी या, आसरा हृदयात दे
साद देते मी तुला अन् तू मला पडसाद दे
या हंसध्वनी रागाच्या अंगाने जाणार्या गाण्याला इतकं सरळ करताना- शब्दांचा अर्थ, उच्चारण व भाव स्पष्टपणे सर्वांना जाणवला पाहिजे- या गोष्टींचा विचार करण्यात व अभ्यास करण्यात माझी दहा वर्षे गेली. संगीतकाराला शब्दांची स्वरांमध्ये जुळवाजुळवी करताना, गाणार्याच्या गळ्यातून गाताना ती सुरावट कशी वाटेल आणि त्या गळ्याला किंवा गायिकेला आवाजाला शोभून दिसेल की नाही याचाही विचार करावा लागतो.
या कल्पना दृढ होण्यासाठी मी अनेक भावगीत गायकांचे कार्यक्रम ऐकले. गजानन वाटवे, सुधीर फडके, बबनराव नावडीकर, आर्. एन्. पराडकर, गोविंदराव कुरवाळीकर यांचे कार्यक्रम ऐकले. त्यावरून मी काय करायला हवं याचा अंदाज घेतला. या सर्व कलाकारांचं गायन मी जरी ऐकलं तरी त्यांची कधी कॉपी केली नाही. आपलं गायन हे स्वतंत्र व निराळं वाटलं पाहिजे असं ठरवलं होतं.
(संपादित)
अजून त्या झुडुपांच्या मागे
संगीतकार दशरथ पुजारी यांचे आत्मकथन
शब्दांकन- वसंत वाळुंजकर
सौजन्य- आरती प्रकाशन, डोंबिवली.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.