इकडे तिकडे चोहिंकडे
वरती खालीं मोद भरे
वायूसंगें मोद फिरे
नभांत भरला
दिशांत फिरला
जगांत उरला
मोद विहरतो चोहिंकडे
आनंदी आनंद गडे !
सूर्यकिरण सोनेरी हें
कौमुदि ही हंसते आहे
खुलली संध्या प्रेमानें
आनंदे गाते गाणें
मेघ रंगले
चित्त दंगलें
गान स्फुरलें
इकडे तिकडे चोहिंकडे;
आनंदी आनंद गडे !
नीलनभीं नक्षत्र कसें
डोकावुनि हें पाहतसे
कुणास बघतें? मोदाला !
मोद भेटला का त्याला?
तयामधें तो
सदैव वसतो,
सुखें विहरतो
इकडे तिकडे चोहिंकडे
आनंदी आनंद गडे !
वाहति निर्झर मंदगति
डोलति लतिका वृक्षतती
पक्षि मनोहर कूजित रे
कोणाला गातात बरें?
कमल विकसलें
भ्रमर गुंगले
डोलत वदले-
इकडे तिकडे चोहिंकडे
आनंदी आनंद गडे !
स्वार्थाच्या बाजारांत
किती पामरें रडतात
त्यांना मोद कसा मिळतो?
सोडुनि स्वार्था तो जातो
द्वेष संपला
मत्सर गेला
आतां उरला
इकडे तिकडे चोहिंकडे;
आनंदी आनंद गडे !
गीत | - | बालकवी |
संगीत | - | पं. हृदयनाथ मंगेशकर |
स्वराविष्कार | - | ∙ लता मंगेशकर ∙ आशा खाडिलकर ( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. ) |
गीत प्रकार | - | कविता |
टीप - • काव्य रचना- दिवाळी १९०९. • स्वर- लता मंगेशकर, संगीत- पं. हृदयनाथ मंगेशकर. • स्वर- आशा खाडिलकर, संगीत- श्रीधर फडके. |
कौमुदी | - | चांदणे. |
तति | - | रांग / समुह. |
मोद | - | आनंद |
माणूस हाही वास्तविक निसर्गाचाच एक घटक आहे. तथापि 'स्वार्था'मुळे हा घटक इतर निसर्ग-घटकांहून वेगळा राहिला आणि परिणामी दु:खाचा धनी झाला, असेच काही बालकवींना येथे सुचवायचे आहे असे वाटते.
त्यांना मोद कसा मिळतो?
सोडुनी स्वार्था तो जातो
या ओळी पाहता असेच वाटते. द्वेष, मत्सर संपताच म्हणजे स्वार्थ जाताच आनंद येतो, हे शेवटी कवीने सांगितले आहे.
बालकवींच्या या तत्त्वज्ञानापेक्षाही ही कविता तिच्यातल्या सहज, स्वाभाविक, उत्स्फूर्ततेमुळे आणि नादरम्य शब्दयोजनेमुळेच रसिकांना जास्त आवडलेली आहे.
(संपादित)
डॉ. दत्तात्रय पुंडे, डॉ. स्नेहल तावरे
त्रिदल- बालकवी, कुसुमाग्रज आणि इंदिरा संत यांच्या निवडक कविता
सौजन्य- स्नेहवर्धन पब्लिशिंग हाऊस, पुणे.
* ही लेखकांची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.