A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
आनंदाचे डोही आनंदतरंग

आनंदाचे डोही आनंदतरंग ।
आनंदचि अंग आनंदाचे ॥१॥

काय सांगो जालें कांहींचियाबाही ।
पुढें चाली नाहीं आवडीनें ॥२॥

गर्भाचे आवडी मातेचा डोहळा ।
तेथींचा जिव्हाळा तेथें बिंबे ॥३॥

तुका ह्मणे तैसा ओतलासे ठसा ।
अनुभव सरिसा मुखा आला ॥४॥
गीत - संत तुकाराम
संगीत - श्रीनिवास खळे
स्वर- लता मंगेशकर
गीत प्रकार - संतवाणी
भावार्थ

तुकाराम महाराज आनंदाच्या स्थितीचे वर्णन या अभंगात करतात. त्यांचा हा अभंग फार लोकप्रिय आहे. ते म्हणतात, "माझे मन म्हणजे आनंदाचा डोह झाले आहे. आणि त्यात अर्थात आनंदाच्याच लाटा येतात. कारण आनंदाचे सर्व अंग आनंदच असते. काय झाले काही कळले नाही. सर्व काही लोकविलक्षणच घडले. कल्पनेच्या बाहेरचेच घडले आणि त्याच्या आवडीमुळे प्रपंचाची पुढची धाव आणि हाव समाप्त झाली. उदाहरण द्यायचे झाले तर असे म्हणता येईल की, गर्भाशयात बालकाला जी आवड असते तसेच डोहाळे आईला होतात. कारण गर्भाचा स्वभाव व आवडीनिवडी आतूनच आईच्या ठिकाणी प्रकट होतात. त्याप्रमाणे विशिष्ट अनुभवाचा ठसा माझ्या अंतःकरणात उमटला आहे तोच माझ्या मुखाने शब्दातून आपोआप प्रकट झाला."

डॉ. प्रा. जे. बी. शिंदे
देवमुक्त, धर्ममुक्त तुकारामांची गाथा
सौजन्य- स्वरूप प्रकाशन, पुणे-कोल्हापूर.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर भावार्थ

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.