'अयोध्येचा राजा'च्या आधी एक आठवडा पुण्यामध्ये ३० जानेवारी १९३३ रोजी मास्टर आणि कंपनीचा "संत तुकाराम" हा बोलपट प्रदर्शित झाला.
राजापूरकर नाटक मंडळी १९३१ च्या ऑगस्ट महिन्यात नाशिकच्या दौर्यावर असताना बाबाजीराव राणे या मालकाच्या मुलांपैकी रामचंद्र याचे आकस्मिक निधन झाले तेव्हा कंपनी काही काळ बंद ठेवण्यात आली. या काळात बाबाजीरावांच्या आणि दादासाहेब फाळक्यांच्या भेटीगाठी होत असत. तेव्हा फाळक्यांनी 'आता बोलपट तयार होत आहेत तेव्हा तुमची नाटक कंपनी असल्यामुळे तुम्ही बोलपट निर्मिती सहज करू शकाल', असे दादांनी सुचविले. या दृष्टीने राण्यांनी हालचाली सुरू केल्या आणि स्वतःला आवडत असलेल्या तुकारामाच्या "आनंदाचा कंद गाइयेला गीती" या अभंगात थोडा फेरफार करून आपल्या मूळ तुकारामांच्या संहितेत पुन्हा थोडा फरक करून बोलपटाला योग्य असे "आनंदाचा कंद हरी हा देवकीनंदन पाहिला" हे गीत लिहिले.
मराठी बोलपटासाठी लिहिलेले लेखन दिनांकाप्रमाणे हे पहिलेवहिले पटगीत होय. बाबाजीराव राणे यांच्या नातवाने दिलेल्या माहितीप्रमाणे बाबाजीराव वयाच्या सदोतीसाव्या वर्षी निवर्तले. त्यानंतर अनेक अडचणींवर मात करीत त्यांच्या मुलाने 'अयोध्येचा राजा' पूर्वी हा पहिला बोलपट प्रदर्शित केला.
(संपादित)
गंगाधर महाम्बरे
'मौलिक मराठी चित्रगीते' या गंगाधर महाम्बरे लिखित पुस्तकातून.
सौजन्य- दिलीपराज प्रकाशन प्रा. लि., पुणे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
इतर संदर्भ लेख
'राजापूरकर नाटकमंडळी'चे उत्पादक व मालक कै. बाबाजीराव राणे यांचा केवळ आपल्या मंडळीसाठी स्वतंत्र नवीन नाटकें तयार करवून घेण्याचा एक विशेष संकल्प असे. तो त्यांनीं या 'संत तुकाराम' नाटकाच्या पहिल्या आवृत्तीचे प्रस्तावनेत सांगितला आहे, तो असा- 'आपल्या महाराष्ट्रांत होऊन गेलेल्या कित्येक साधुसंतांच्या उपलब्ध असलेल्या जीवनवृत्तांताच्या आधारावर नाटकरचना करून लोकरंजनाबरोबरच त्या त्या संतांविषयींचें प्रेम व आदरबुद्धि वृद्धिंगत करावी व जनचित्ताची प्रवृति सन्मार्गाकडे होईल, असें करावे.”
या संकल्पाप्रमाणें कै. बाबाजीराव यांनीं प्रथम दामाजी, नंतर पुंडलीक, आणि त्यानंतर हें 'तुकाराम' नाटक हातीं घेऊन आपल्या कित्येक कवि मित्रांच्या साहाय्यानें स्वत:ला योग्य वाटलीं त्याप्रमाणें नाटकें तयार करवून अनेक रंग साहित्यानें त्यांचे प्रयोग चित्ताकर्षक व लोकप्रिय केले.
यांपैकीं 'संत तुकाराम' हें नाटक अत्यंतच लोकप्रिय होऊन गेलें आहे. हें नाटक बाहेर पडल्यानंतर मुंबई शहरीं या नाटकाचे लागोपाठ एकसारखे शंभर प्रयोग झाले, आणि श्रीमंत सयाजीरावमहाराजांसारखे परमसुज्ञ राजेरजवाडे, सर चंदावरकरांसारखे विद्वान् थोर गृहस्थ आणि कित्येक इंग्रजी, मराठी, गुजराथी वजनदार पत्रांचे मार्मिक संपादक अशांनीसुद्धां प्रयोग अगत्यानें येऊन पाहून यासंबंधानें आपापल्यापरी पसंतीच व्यक्त केली ! इतकी लोकप्रियता आणि बहुजनसंमती आतांपर्यंत क्वचितच एखाद्या महाराष्ट्र नाटकाला लाभली असेल.
हें श्रेय अनेक अनुकूल गोष्टींच्या एकत्रतेला आहे. नाटकाचा वर्ण्यविषय भक्तिमार्गासारखा निर्मळ, नाटकांतली प्रमुख भूमिका तुकारामबोवासारखी प्रेमळ, त्यांत श्री शिवाजीसारख्या महाराष्ट्रवंद्य राजपुरुषाचा संबंध, ह्यांच्या संयोगानें नाटकाच्या सुरसतेंत अनायासें चांगली भर पडली. त्यांतूनही या नाटकांत कांहीं पात्रांचे स्वभावगुणरेखन ( Characteriation) ठळक झाल्याकारणानें आणि तें अभिनयद्वारां यथार्थ वठवण्याची नटांची मेहनत आणि देखावे, पोषाख इत्यादि रंगसाहित्याची उत्तम जोड याला मिळत गेल्यानें या नाटकाला विशेष रंग आला आहे. कांहीं कांहीं प्रसंगीं प्रेक्षकांची चित्तवृत्ति अगदीं तल्लीन करून सोडण्याचा गुण या नाटकांत विशेष साधला आहे.
नाट्यशास्त्रांत 'सिद्धि' आणि 'समृद्धि' यांची अनुकूलता नाटकाच्या सुप्रयोगासाठीं सांगितली आहे. त्या दोहोंची जोड या नाटकांत बरीच दिसून येते, आणि हेंच त्याच्या आजपर्यंतच्या लोकप्रियतेचें प्रमुख लक्षण आहे. कांहीं कांहीं ठिकाण नाटकाच्या भाषेंत गांवढळगिरी आढळते; पण तुकाराम महाराजांचा काळ आणि त्यांची परिस्थिति लक्षांत घेतां त्यांच्याभोवतीं जमवाव्या लागलेल्या प्रयोगपूरक अधम पात्रांच्या गांवढळ योग्यतेला ती अनुरूपच आहे, असें म्हणावें लागतें. तथापि पूर्वींच्या आवृत्तीपेक्षां यांत बरीच सुधारणा केलेली दृष्टीस पडेल.
'तुकाराम' नाटकाच्या लोकप्रियतेसंबंधानें लिहितांना या नाटकाची प्रथमतः अगदींच साधी रचना करणारे रा. शिरवळकर व प्रयोगरूपानें त्या रचनेचें यथार्थ स्वरूप दर्शविणारे प्रसिद्ध अभिनयपटु रा. गणपतराव जोशी यांचे स्मरण झाल्यावांचून रहात नाहीं. उभयतांनी या नाटकास आधींच कांहींसें गोड स्वरूप आणून ठेवलें होतें. त्याचाही उपयोग याच्या लोकप्रियतेस झाल्याबद्दल कै. बाबाजीरावसुद्धां या उभयतांचा नेहमी साभार धन्यवाद गात असत.
कै. बाबाजीराव यांचे मागें त्यांचा सर्व पसारा त्यांचे चिरंजीव रा. रा. माधवराव यांनीं संभाळला आहे, आणि वडिलांचा व्यवहारदक्ष कित्ता पुढे ठेवून त्यांच्या पावलानें जाऊन उत्तरोत्तर अधिक यश व श्रेय संपादन करण्याची उमेद ठेवली आहे, हें त्यांस भूषणावह आहे. परमेश्वर त्यांची उमेद पूर्ण करो, हीच इच्छा आहे.
(संपादित)
बाबाजीरावांचा शुभचिंतक एक मित्र.
दि. ३ जून १९१६
'संत तुकाराम' या नाटकाच्या पुस्तकाच्या द्वितीयावृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- महादेव बाबाजीराव राणे (प्रकाशक)
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
इतर संदर्भ लेख
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.