चरणी पावन फुले । स्वर्ग या विजनात
रसमय मंजुळ गीत गात मानस भरे
कमलदली जशी पुनवरात..
गीत | - | कुसुमाग्रज |
संगीत | - | पं. जितेंद्र अभिषेकी |
स्वर | - | रामदास कामत |
नाटक | - | मीरा.....मधुरा ! |
राग | - | नंद |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत |
मानस | - | मन / चित्त / मानस सरोवर. |
विजन | - | ओसाड, निर्जन. |
सुधा | - | अमृत / सरळ, योग्य मार्गाने जाणारा. |
माझ्या मनातली मीरादेवी प्रत्यक्ष इतिहासकाळात कशी घडली, वाढली ते मला ठाऊक नाही. (इतिहासाला तरी ठाऊक आहे का?) पण खचित की, मीरादेवीच्या वैवाहिक जीवनाबद्दल तिचे चरित्रकारही फारसा प्रकाश टाकू शकत नाहीत. मीरादेवीच्या हृदयात श्रीकृष्णदैवताबद्दल प्रणयाचा हा मधुर भाव केव्हा आणि कसा उपजला याबद्दल एकदोन प्रसंगांतच तिचे बालपण सांगितले जाते. तिचा विवाह युवराज भोजराजाशी इ. स. १५१६ मधे झाला आणि इ. स. १५२७ मधे भोजराजाचा मृत्यू ओढवला, यापलीकडे तिच्या चरित्रकारांनाही तिच्या संसाराबद्दल काहीही सांगता येत नाही. कौमार्यावस्थेपासूनच मीरादेवीच्या हृदयात श्रीकृष्णाबद्दल हा प्रीतीचा मधुरभाव उपजला आणि बळावला असावा आणि विवाहानंतरही वैधव्यदशा येईपर्यंतच्या काळात तो अत्युत्कट झाला असावा, असे मला वाटते. तिची श्रीकृष्णप्रीती ही वैधव्यदशेतून निर्माण झालेली केवळ प्रतिक्रिया नव्हती, असे मानायचे असेल, तरीही वरील वस्तुस्थितीच पत्करणे भाग पडते. एका मीरागीताचे विवरण करताना प्रो. देशराज सिंह भाटी यांनी ('मीराबाई और उनकी पदावली', पृष्ठ १७४, १७५, १७६)
राणा बरजे, रागी बरते, बरजे सब परिवारी ।
कुँवर पाटवी सो भी बरजे सब परिवारी ।
या ओळींवर असे भाष्य केले आहे की, "... प्राप्त इतिहास बताता है कि मीराँ का संघर्ष वैधव्य के बाद ही प्रारंभ हुवा है, जबकी भोजराज के सौतेला भाई राज्याधिकारी बने । उपर्युक्त पद के आधारपर मीराँ का संघर्ष भोजराज की जीवित अवस्था में ही प्रारंभ हो जाता है और वह भी कृष्ण की आराधना हेतु नहीं, अपितु अवस्था में ही प्रारंभ हो जाता है और यह भी कृष्णकी आराधना हेतु नहीं, अपितु इसलिए कि.." 'नित प्रति उठि नीच घर जाओ' और 'नाचौ दे दे तारी' हा उल्लेख जरी सोडला तरी मीरादेवी आणि उदादेवी, त्यांचा संवादात्मक असा जो भाग मीरागीतांतून प्रकटतो त्यावरूनही या संघर्षाला मीरादेवीच्या विवाहकालीच प्रारंभ झाला होता, असे दिसते. उदाबाईने मीरादेवीला 'साधुसंतांच्या संगतीचा त्याग कर, साजशृंगार कर, आणि भोगो भोग अपार' असा दिलेला सल्ला तिचा सौभाग्यकालच सूचित करतो.
'कल्याण कल्पतरू' नामक एका इंग्लिश जर्नलचा (जानेवारी १९३४) चा एक अंक सहज योगायोगाने माझ्या हाती पडला. त्यात श्री. नलिनीमोहन संन्याल यांनी मीराबाईवर एक प्रदीर्घ लेख लिहिला आहे. या लेखाच्या प्रारंभीच राजस्थानात प्रचलित असलेली एक गोष्ट त्यांनी सांगितली आहे. त्या कथेत प्रस्तुत नाटकात प्रतिबिंबित झालेल्या अनेक घटना मला मिळाल्या. या कथेतच, मीरादेवीचा पती भोजराज कवी होता, गायक होता.. तिची ख्याती ऐकून वेशांतर करून तो मेड़त्याला तिला पाहायला गेला.. तिला पाहिल्यावर तिच्याशीच विवाह करण्याचा त्याने हट्ट धरला.. पुढे विवाह झाल्यावर संघर्ष वाढत गेला आणि अखेर एक नृत्यप्रकरणावरून पतीने दिलेले दूषण सहन न होऊन मीरादेवी वृंदावनाला निघून गेली.. इत्यादी तपशील मला मिळाले. हे सारे तपशील आणि या घटना इतिहासाला मंजूर आहेत की नाहीत त्याच्याशी मला कर्तव्य नाही. माझ्यापुरत्या त्या खर्या आहेत आणि म्हणूनच मी त्या स्वीकारल्या आहेत.
पण त्यामुळेच मीरादेवीच्या वैवाहिक जीवनाचा विचार करताना मला एका चमत्कारिक त्रिकोणाची प्रतीती आली. मीरादेवी-भोजराज आणि भगवान श्रीकृष्ण. मीरादेवी ठामपणाने प्रत्येक गीतातून श्रीकृष्णाचा उल्लेख 'पती आणि प्रियकर' याच शब्दाने करते, म्हणून 'त्रिकोण' ही संज्ञा वापरावी लागते. श्रीकृष्णाला ती केवळ 'पती वा प्रियकर' असे संबोधून थांबत नाही, तर कल्पनेच्या साक्षात्कारी विश्वात स्वतःपुरती ती त्याला करते आणि प्रणयातले सगळे रागरंग ती तन्मयतेने, धीटपणे भोगते.
हे सगळे 'राधा' नावाच्या कल्पित स्त्रीच्या संदर्भात समजता येते. पण इतिहासकालात घडलेली व्यक्ती म्हणून मीरादेवीचा विचार करताना मीरेची श्रीकृष्णप्रीती चमत्कारिक वाटते, विसंगत वाटते, विचित्र वाटते. 'भक्ती' हा शब्द सोज्वळ वाटतो. त्या मानाने 'प्रीती.. प्रणय' हे शब्द उग्र वाटतात आणि कोणा स्त्रीमुखातून प्रकट होताना भारतीय परंपरेत तरी हे शब्द 'चारित्र्य.. नीती.. शील' यांसारखी अनेक आव्हाने निर्माण करतात. 'आई, बाप, बहीण, भाऊ, गुरू' इत्यादी अनेक नात्यांनी देवाशी सख्यत्व जोडणारे साधुसंत आणि संतवृत्तीच्या स्त्रिया भारतीय परंपरेत कशा चपखल बसतात. देवाला 'प्रियकर' मानणारे पुरुषश्रेष्ठही कोठे कोठे भेटतात, तेव्हा ही परंपरा- 'सिद्धांची सगळीच साधना दुनियावेगळी' एवढाच निष्कर्ष काढून मोकळी होते.
पण श्रीकृष्णाला प्रियकर आणि पती मानणारी, कल्पनेच्या अनुभवविश्वात हे नाते क्षणोक्षणी जागणारी, तसे भीडभाड सोडून उघडपणे प्रकट करणारी स्त्री.. त्यातही विवाहित स्त्री.. एक महाराणी.. अशी एकच, मीरादेवी. देवाशी सख्यत्व जोडणारी इतर सगळी नाती तिने वर्ज्य मानली आहेत. 'प्रीती' ऐवजी 'भक्ती' आणि 'पती' ऐवजी 'पिता' एवढा छोटासा बदल ती या सख्यत्वभावनेत करती तर तिचा कोणताच छळ झाला नसता. पण तिने तसे केले नाही. विवाहानंतरही, गुणवान रसिक दिलदार पतीच्या संसारात राहून देखील ती श्रीकृष्णालाच आपला 'प्रियकर आणि पती' मानू लागली, त्यासाठी तळमळू लागली तेव्हा शिसोदे वंशातल्या राजकुलात एक चमत्कारिक भीषण नाट्य प्रकटले असले पाहिजे. हा एक असा त्रिकोण होता की, ज्यातली एक बाजू (भगवान श्रीकृष्ण) अस्तित्वातच नव्हती. पण अस्तित्वात नव्हती म्हणावे तर मीरादेवीच्या हृदयात ती जळजळीत जागती होती. त्या जागतेपणाचा एक दृश्याकार म्हणजे तिचे गाणे-नाचणे. पण खचित भोजराजासारख्या रसिक पतीला यापलीकडचे, न बोलता येण्यासारखे काही एक तीव्र अनामिक जगावेगळे दुःख भोगावे लागले असले पाहिजे. श्रीकृष्णाची प्राप्ती होत नाही म्हणून मीरादेवी आणि मीरादेवीची (विवाह होऊनही) प्राप्ती होत नाही म्हणून भोजराज, ही माणसे.. हाडामांसाची माणसे जेव्हा तडफडू लागतात.. त्यांतही परस्परांबद्दल अपार प्रीती बाळगूनही विरहदुःख भोगीत प्रणयाचे विविध रंगराग व्यक्त करू लागतात तेव्हाच एक आगळे नाट्य आकार घेऊ लागते आणि प्रीतीचा शोध जन्माला येतो. प्रस्तुत नाटक म्हणजे असाच एक शोध आहे. श्रीकृष्ण निमित्तमात्र आहे, म्हणूनच तो या नाटकात केवळ मूर्तिरूपाने, क्वचित बांसरीरूपाने अवतरतो आहे. आहेत ती फक्त हाडामांसाची दोन माणसे. दोन प्रेमिक. मीरादेवी आणि भोजराज. म्हणूनच हा शोध आहे मीरादेवीचा आणि भोजराजाचा. खरे सांगायचे तर, त्या दोघांना झपाटणार्या प्रणयभावनेचा.
हा शोध एका अर्थाने भाविकांनी आणि सांप्रदायिकांनी मीराचरित्राला दिलेल्या अर्थाला छेद देऊन जातो. भाविकांनी आणि सांप्रदायिकांनी मीरादेवीचे चित्र आपल्या परंपरेत बसावे असे, आपल्या रुचीप्रमाणे आणि रीतीप्रमाणे 'संत' कल्पनेच्या चौकटीत छाटून ठोकूनठाकून कसे सुबक बसवले आहे. त्यामुळेच तुकारामास जसा मंबाजी, सखूबाईस जशी तिची सासू, तसा मीरादेवीचा छळ करून तिजबद्दल सहानुभूती मिळवण्यासाठी राजा विक्रमजित वा उदादेवी या व्यक्तिरेखा सांप्रदायिक काळ्या रंगात रंगवल्या जातात.
माझ्या नाटकात हा सांप्रदायिक रंग दिसणार नाही. ही माणसे मूलतः व्यवहारधर्म मानणारी आणि पाळणारी माणसे आहेत. विक्रमजित मठ्ठ असेल, उदादेवीलाही मीरादेवीची झेप कदाचित न कळणारी असेल, तरीही ती प्रेमळ आहेत आणि त्यांचे मागणे देखील काही जगावेगळे नाही. जगावेगळी आहे ती मीरा. तिच्या प्रीतीत गुरफटल्यामुळेच अधांतरी अवस्थेत अपार वैफल्य भोगणारा जगावेगळा होतो भोजराज आणि मग एक विचित्र, विक्षिप्त नाट्य धुमसू लागते. या धुमसणार्या नाट्याचा एक उद्रेक म्हणजेच- 'मीरा..मधुरा !'
या नाटकाच्या लेखनकाळी अनेकांचे साहाय्य मला झाले आहे. माझे मित्र कविश्रेष्ठ शिरवाडकर यांनी आपुलकीने या नाटकातली काही गीते लिहून दिली : नानंद सुधा बरसे...(अंक १ ला) चंद्र हवा घनविहीन.. (अंक २ रा) मानिले मी प्रेम.. (अंक ३ रा) आणि हस्तलिखित वाचून फार मोलाच्या सूचना दिल्या. माझ्या स्नेही कु. मालती इनामदार यांनी त्यांच्या एकदोन गीतांचा- जेव्हा धुंद होऊन हिंडत होते.. (अंक १ ला) थोडा फेरफार करून उपयोग करण्याची मला परवानगी दिली.
(संपादित)
वसंत कानेटकर
दि. २२ डिसेंबर १९७०
'मीरा.. मधुरा !' या नाटकाच्या पुस्तकाच्या प्रथमावृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- पॉप्युलर प्रकाशन, मुंबई.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.