A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
आनंदकंद ऐसा

आनंदकंद ऐसा । हा हिंददेश माझा ॥

सत्यास ठाव देई । वृत्तीस ठेवि न्यायी ।
सत्यासि मानि राजा । हा हिंददेश माझा ॥

जगदीश जन्म घेई । पदवीस थोर नेई ।
चढवी स्वधर्मसाजा । हा हिंददेश माझा ॥

जनकादि राजयोगी । शुक वामदेव त्यागी ।
घुमवीति कीर्तीवाजा । हा हिंददेश माझा ॥

गंगा हिमाचलाची । वसती जिथें सदाची ।
होऊनि राहि कलिजा । हा हिंददेश माझा ॥

पृथुराज सिंह शिवजी । स्वातंत्र्यवीर गाजी ।
करिती रणांत मौजा । हा हिंददेश माझा ॥

तिलकादि जीव देहीं । प्रसवूनि धन्य होई ।
मरती स्वलोककाजा । हा हिंददेश माझा ॥

जगिं त्याविना कुणीही । स्मरणीय अन्य नाहीं ।
थोरांत थोर समजा । हा हिंददेश माझा ॥

पूजोनि त्यास जीवें । वंदोनि प्रेमभावें ।
जयनाद हाचि गर्जा । हा हिंददेश माझा ॥