काटे सरून गेले, उरली फुले मनात
प्रत्येक पावलाचे होते नवे इशारे
सार्या ऋतूंत जपला हृदयातला वसंत
गीत | - | विजय कुवळेकर |
संगीत | - | आनंद मोडक |
स्वर | - | जयश्री शिवराम, हसीना |
चित्रपट | - | तू तिथं मी |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
या चित्रपटाला संगीत देणं हा अनेक अर्थांनी निराळा अनुभव होता. ज्याला रूढार्थानं 'गीत' म्हणता येईल, अशी गाणी या चित्रपटात फारशी नव्हतीच. पूर्ण लांबीची दोन गीतं वगळता बाकीची होती ती 'साँगलेट्स' - त्यांना मी 'गाणुली' म्हणतो. 'जैत रे जैत' नंतर अनेक वर्षांनी अशी साँगलेट्स चित्रपटात वापरली गेली. 'तू तिथं मी' मध्ये ही साँगलेट्स अतिशय मोलाची भूमिका बजावतात. चित्रपटातील उत्कट क्षण ही 'गाणुली' जागवतात, नाट्यमयता खुलवतात, कथानक तरलपणे पुढे नेतात. अशा 'गाणुल्यां'ना त्यांचं अंतरंग जाणून घेत गेय रूप देणं, ही माझ्यापुढची मोठी कामगिरी होती.
विजय कुवळेकर यांनी लिहिलेले शब्द ताकदीचे होते त्यामुळे शब्दांच्या पलीकडे सुरांतून काही सांगण्याचं जादा स्वातंत्र्य घ्यावं, असा अवकाश नव्हता. म्हणून या शब्दांना संगीतानं फार न सजवता अधिकाधिक तरल रूप द्यायला हवं होतं. अशावेळी गीतकार आणि संगीतकार यांचा सूर जमणं अत्यावश्यक असतं. कुवळेकर आणि माझ्या अनेक भेटीगाठी झाल्या. शब्दाशब्दावर, ओळीओळीच्या बाजावर, कवितेच्या पोतावर अनेकवार चर्चा झाल्या. अशा औपचारिक-अनौपचारिक गप्पांच्या मैफलींतून गीतकार-संगीतकाराचा सूर पक्का जुळत गेला आणि 'तू तिथं मी'ची सुरेल साँगलेट्स आकाराला येत गेली.
या सार्या साँगलेट्सचे 'मूड' निरनिराळे होते. अनेक भावछटांचं अस्तर त्याला होतं. ते कुठेही उसवू द्यायचं नव्हतं. मग 'जळ डहुळले'ला बासरी, 'साद कोकिळ घालतो'ला फक्त संतूर, तबला आणि तानपुरा तर 'आलो कुठून कोठे'ला तंबोरा, तबला आणि की-बोर्ड अशा कमीत कमी वाद्यांचा वापर केला."
(संपादित)
गंगाधर महाम्बरे
मौलिक मराठी चित्रगीते
सौजन्य- दिलीपराज प्रकाशन, पुणे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.