A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
आला किनारा आला किनारा

आला किनारा !
निनादे नभीं नाविकांनो इशारा
आला किनारा !

उद्दाम दर्यामधें वादळी
जहाजें शिडावून हीं घातलीं
जुमानीत ना पामरांचा हकारा
आला किनारा !

प्रकाशे दिव्यांची पहा माळ ती
शलाका निळ्यालाल हिंदोळती
तमाला जणू अग्‍निचा ये फुलोरा
आला किनारा !

जयांनीं दलें येथ हाकारलीं
क्षणासाठिं या जीवनें जाळलीं
सुखेनैव स्वीकारुनी शूल-कारा-
आला किनारा !

तयांच्या स्मृती गौरवें वन्‍दुनी
उभे अंतिंच्या संगरा राहुनी
किनार्‍यास झेंडे जयाचे उभारा
आला किनारा !