A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
आज जिंकिला गौरीशंकर

आज जिंकिला गौरीशंकर
जयजय भारत भाग्य शुभंकर

सतत झुंजला तुजसी मानव
आज तुझा जाहला पराभव
तूंच तुझा हा केला गौरव
गर्जति जयजय हे गिरिकंदर

जलीं जिंकिला, स्थलीं जिंकिला
मानवापुढें निसर्ग नमला
तिसरें पाऊल ठेवायाला
बलिराजा हो उदार भूधर

मानबिंदू हा तुंग हिमाचल
पंख झडपितां उठवी वादळ
तरिही झेप घे हा नरशार्दुल
नेपाळाचा वीर धुरंधर

तेनसिंह नाचला थयथया
विशालदेहीं दुबळी काया
तूंच चढविलें माथ्यावरि या
जयजय भारत भाग्य शुभंकर