A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
आईवरी विपत्ति आम्ही मुलें

आईवरी विपत्ति आम्ही मुलें कशाला !
बंदींत मायभू ही आम्ही खुले कशाला !

जखडून बांधियेली बघवे तिच्या न हालां
तिज फांस नित्य फट्के हृदयांत होय काला
रक्ताळलें शरीर भडका जिवांत झाला
आईस सोडवाया येणार कोण बोला?

पाहूं स्वराज्य देर्शी या देहिं याच डोळां
मरणें म्हणे नको जो काढा तया निराळा
मरणें स्वयें पटे ज्या मारून हांक काळा
आईस सोडवाया तो मातृभक्त भोळा
रक्ताळलें शरीर भडका जिवांत झाला
आईस सोडवाया येणार कोण बोला?
गीत - सेनापती बापट
संगीत -
स्वर- रवींद्र साठे
गीत प्रकार - स्फूर्ती गीत
पांडुरंग महादेव अर्थात सेनापती बापट (१८८०-१९६७) यांचे नाव ठाऊक नसलेला सुजाण मराठी माणूस विरळाच असेल. सेनापती बापट सशस्त्र क्रांतिकारक, बॉम्बविद्येचे प्रवर्तक होते. मुळशी धरण आंदोलनाचे सेनापती होते. ब्रिटिश, पोर्तुगीज, निजाम या तिन्ही देशशत्रूंविरोधात त्यांनी लढा दिला होता. इतकेच नव्हे त्यांनी स्वतंत्र भारतात सरकारविरोधात महागाईविरोधी आंदोलन केले होते. संयुक्त महाराष्ट्र लढ्याचे नेतृत्वही त्यांनी केले होते. हे सारे अनासक्त बुद्धीने करताना त्यांनी विपुल लेखन केले होते. त्यात पद्यमय आत्मचरित्र, श्रीअरविंदांच्या अनेक ग्रंथांची भाषांतरे इत्यादीचा समावेश आहे.

सेनापती बापटांना पद्यमय लिहिण्याची भारी हौस होती, त्यामुळे आत्मचरित्र नि अनेक पत्रे त्यांनी पद्यमय पद्धतीने लिहिली. खरेतर सशस्त्र क्रांतीचा लेखक होण्याची त्यांची मनीषा होती. पण वीर सावरकरांना भेटताच; त्यांचे ज्वलजहाल लेखन पाहून 'हाच जन्मजात क्रांतिकारी लेखक आहे, त्याच्याकडेच हे काम सोडून द्यावे व आपण कृतिशील कामात उतरावे' असा भाव त्यांच्या मनी जागला अन् तसा निश्चय करून ते कृतिशूर सेनापती बनले. यात त्यांची गुणग्राही वृत्ती अन् विनय जसा दिसतो तशीच निःस्पृह, निर्मळ नि निरलस देशभक्तीही दिसते.

हिंदुत्वनिष्ठ सावरकरांच्या भागानगर निःशस्त्र लढ्यात पहिला सत्याग्रही म्हणून सहभागी होत असतानाही, हिंदू-मुस्लिम ऐक्याचे स्वप्‍न ते बाळगत होते. गांधीजींच्या आंदोलनात सहभागी होतानाही गांधींच्या 'आसक्तीविण हिंसा शक्य नाही' या मूळ सिद्धांताला ते नाकारत होते. स्वयंसिद्ध कष्टभोगी देशभक्त अशीच त्यांची ओळख होती. देशासाठी सुमारे १६ वर्षे त्यांनी तुरुंगवास भोगला होता. त्यांच्या ऋषितुल्य जीवनाचा आढावा घेताना साने गुरुजी १९३९ मध्ये लिहितात, 'सेनापती म्हणजे मला लोकमान्य, महात्माजी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे अपूर्व मिश्रण वाटते.' साने गुरुजींचे हे मूल्यमापन अत्यंत योग्य आहे.

सेनापतींच्या काव्यात साधेपणा आहे. त्यात आपण प्रत्यक्ष काय केले नि करावे याचाच आढावा आहे. त्यामुळे ते रंजक नसले तरी बोधक आहे, कार्य प्रवर्तक आहे. शांतपणा त्यांच्या काव्याचा आत्मा असूनही कधी-कधी निराळेच तेज त्यातून प्रकट होते. महाराष्ट्र नि मराठ्यांचा भारत विजयी इतिहास त्यांना मोह घालतो. त्यामुळे महाराष्ट्र अन् मराठ्यांवर अनेक कविता सेनापतींनी लिहिल्या. त्यातील खालील चार पंक्ती तर अजरामर झाल्या.

महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले ।
मराठ्यांविना राष्ट्रगाडा न चाले ॥
खरा वीर वैरी पराधीनतेचा ।
महाराष्ट्र आधार ह्या भारताचा ॥

सेनापतींच्या या ओळी गेल्या तीन-चार शतकांचा इतिहास दाखविणार्‍याच आहेत. त्यांच्या पाठी मराठ्यांनी दाखविलेली उपजत देशभक्ती हेच कारण आहे. हीच उपजत देशभक्ती दाखविताना सेनापती 'येणार कोण बोला' ही कविता लिहितात. ही कविता आत्मपर नसून आवाहनात्मक आहे. लोकांना ते विचारतात,

आईवरी विपत्ति आम्ही मुलें कशाला !
बंदींत मायभू ही आम्ही खुले कशाला !
जखडूनि बांधियेली बघवे तिच्या न हालां
तिज फांस नित्य फट्के हृदयांत होय काला
रक्ताळलें शरीर भडका जिवांत झाला
आईस सोडवाया येणार कोण बोला?

पहिल्या कडव्यात ते आपल्या मातृभूमीची दुर्दशा वर्णिताना विचारतात, "आईवर संकट आलेले असताना ते दूर करणार नसू तर आम्ही तिची मुलें कसे काय म्हणविणार? ती पारतंत्र्यात जखडलेली असताना आम्ही स्वतंत्र कसे राहू शकणार? तिचे हाल, दुर्दशा पाहवत नाही. तिला रोज फटके मारले जातात, सुळावर चढविले जाते, तिचे रक्त रोज शोषले जाते. हे पाहून हृदय कासावीस होते, मस्तकात आग उसळते, अशा परवश मातृभूमीला मुक्त करायला कोण येणार बरे?" ही निव्वळ पृच्छा नाही तर आधी कृती अन् मग आवाहन आहे. ज्या काळी स्वातंत्र्य शब्द उच्चारणे अपराध गणले जात होते, तेव्हा कवी करीत असलेले आवाहन पाहता त्याच्या धाडसाला धन्य धन्य म्हणत, प्रणिपातच करावे वाटतात.

आईस सोडवूंच निर्धार हा कुणाचा?
आहे कुणा पसंत व्यवहार हा खुनाचा?
आईस सोडवाया खून स्वयें स्वतःचा
व्हावा, सुखें कराया व्यवहार हा खुनाचा
बेभान कोण कोण पाहुनि माय-जाचा
या तेच सोडवाया व्यवहार हा खुनाचा

दुसर्‍या कडव्यात ते पुसतात, 'आईस पारतंत्र्यातून सोडवूच असा निर्धार ज्यांनी केलाय त्यांनीच यावे. यासाठी खुनाचा व्यवहार करावा लागेल. हा खून दुसर्‍या कोणाचा नसून स्वतःने स्वतःचा करावयाचा आहे. आईचा होणारा जाच पाहून जे बेभान होतील तेच हे करू धजतील. सेनापतींचे 'व्यवहार हा खुनाचा' हे शब्द त्यांच्या साध्याभोळ्या मनाचे निदर्शक आहेत. ज्याला तात्याराव सावरकर आत्ममर्पण म्हणतात त्यालाच तात्याराव बापट व्यवहार खुनाचा म्हणतात. आपले म्हणणे अधिक स्पष्ट करताना पुढील कडव्यात ते म्हणतात, 'ज्यांना याचि देही याचि डोळा स्वातंत्र्य पाहण्याची आस असेल, जे म्हणतात मरण नकोय त्यांना बाजूला काढा अर्थात वगळा. मात्र जो कोणी काळाला आव्हान देऊन मृत्यूला वरील तोच भोळा मातृभक्त आईला मुक्त करील.' येथे हटकून वीर सावरकरांचे, 'अगदी आरंभापासून आमची हीच धारणा होती, की आम्ही देशाचे स्वातंत्र्य पाहायला जन्मलो नाही, तर त्यासाठी लढता लढता मरायला जन्मलो आहोत,' हे उद्‍गार स्मरतात. आपल्या एकेकाळच्या गुरूचे हृद्‍गतच कवी वर्णितो असे वाटते.

पाहूं स्वराज्य देर्शी या देहिं याचि डोळां
ऐसें म्हणे कुणी जो काढा तया निराळा
जो कोणि असहकारी विधिभंग भक्त भोळा
मरणें नको म्हणे जो काढा तया निराळा
मरणें स्वयें पटे ज्या मारूनि हांक काळा
आईस सोडवील तो मातृभक्त भोळा

भाई महंमदीचे तैसे हरीजनांचे
हिंदूर्शि ऐक्य पुरतें व्हाया खरें मनाचें
हिंदूसि त्यागबुद्धि व्हावी; तदर्थ ज्याचें
मन आत्महोम-वांछी होमार्थ नित्य नाचे
तो ऐक्य भक्त भोळा मरणें विशुद्ध त्याचें
आईस सोडवील दास्यांतुनी सदाचें

चौथ्या कडव्यात सेनापती बापटांना वाटते, हिंदू-मुस्लिम यांचे ऐक्य झाले. त्याच वेळी आत्म होम करण्यासाठी ते सर्व सिद्ध झाले तर ते ऐक्यच मातृभूमीला परदास्यातून कायम सोडवील.

गाऊनि आइ, आई नाचोत नाचणार
लीहूनि लेख लाख वाचोत वाचणार
घेऊनि बंदिवास कांचोत कांचणार
भीऊनि यांस आई सोडी न जाचणार
रक्ताळलें शरीर भडका जिवांत झाला
आईस सोडवाया येणार कोण बोला?

शेवटल्या कडव्यात ते निक्षून म्हणतात, 'केवळ आई, आई गाऊन किंवा लेखावर लेख लिहून किंवा तुरुंगात खितपत पडून राहिल्याने जाच करणारे भिऊन आईला सोडतील असे थोडीच आहे. त्यासाठी तर जिवात भडका उडाला पाहिजे अन् शरीर रक्ताने माखले पाहिजे. तरच आई मुक्त होईल, स्वतंत्र होईल. या काजासाठी कोण यायला तयार आहे बरे?' कवीची असलेली कृतिशूर सेनानीची वृत्तीच या कडव्यात प्रकट होते. ज्या काळी यावर बोलणे दंडनीय अपराध गणले जात असे, त्या काळी हे करायला किती जण धजणार? म्हणून तर ते यात प्रश्नार्थक चिन्ह घालताना दिसतात.

रसिका ! शस्त्र, झाडू नि लेखणी कमालीच्या शिताफीने चालवणार्‍या या देशभक्त, शूर सेनानीची ही कळकळीची हाक आजही आपल्याला साद घालते. देश पारतंत्र्यात असतानाच नाही तर स्वतंत्र असतानाही हा टाहो जिवंत मनाला जागवत राहतो.
(संपादित)

डॉ. नीरज देव
(लेखक प्रख्यात मनोविकारतज्ज्ञ आहेत.)
सौजन्य- दै. सकाळ (३ एप्रिल, २०२२)
(Referenced page was accessed on 17 April 2024)

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.