रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा
भीति न आम्हा तुझी मुळीहि गडगडणार्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जिभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा
दरीदरीतुन नाद गुंजला महाराष्ट्र माझा
काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला
निढळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा
गीत | - | राजा बढे |
संगीत | - | श्रीनिवास खळे |
स्वर | - | शाहीर साबळे |
राग | - | भूप |
गीत प्रकार | - | स्फूर्ती गीत |
टीप - • हे पद (या पदाची पहिली दोन कडवी) महाराष्ट्र राज्याचे 'राज्यगीत' म्हणून अंगिकरण्यात आले आहे. • राष्ट्रगीताबाबतीत जसे तारतम्य बाळगण्यात येते, तसेच ते राज्यगीताच्या बाबतीत सुद्धा बाळगण्यात यावे. मात्र राष्ट्रगीताचा मान, सन्मान व प्रतिष्ठा सर्वोच्च राहील. • राज्यगीत १.४१ मिनिटात वाजवले अथवा गायले जावे. |
थडी | - | तीर / कुळ / मर्यादा. |
निढळाच्या घामाचा | - | (कपाळाचा घाम) स्वत:च्या अंगमेहनतीने मिळवलेला. |
जय जय महाराष्ट्र माझा- गर्जा महाराष्ट्र माझा
रावी ते कावेरी भारत भाग्याच्या रेषा
निळेनिळे आकाश झाकते या पावन देशा
तुंग हिमालय, विंध्य अरवली, सह्याद्री निलगिरी
उत्तर दक्षिण वारे पाउस वर्षविती भूवरी
रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीष्मथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा
भीति न आम्हा तुझी मुळीहि गडगडणार्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा
दरीदरींतुन नाद गुंजला महाराष्ट्र माझा
गलमुच्छे पिळदार मिशीवर उभे राहते लिंबू
चघळित पाने पिकली करितो दो ओठांचा चंबू
मर्द मराठा गडी ओढतो थंडीची गुडगुडो
ठसक्याची लावणी तशी ही ठसकदार गुलछडी
रंगरंगेला रगेल मोठा करितो रणमौजा
काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी
निढळाच्या घामाने भिजला
दारिद्र्याच्या उन्हात शिजला
देश गौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तक्त राखितो महाराष्ट्र माझा
आज मुंबईच्या एका महारस्त्यावरील चौकाला 'राजा बढे' यांचे नाव दिले आहे. त्यांच्या वाङ्मयीन आणि गीतलेखनातील अजोड कामगिरीला मुंबापुरीकरांचा कृतज्ञतेने केलेला हा सलाम. त्या राजा बढे चौकापाशी पोहोचल्यावर मला आठवण होते ती त्यांच्या 'गर्जा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा' या महाराष्ट्रगीताची. अशा वेळी नवमहाराष्ट्र निर्मितीची कहाणीच आठवू लागते.
राजाभाऊंच्या महाराष्ट्रगीताच्या आधी माझ्या मनी-मानसी गडकरी-कोल्हटकरांची महाराष्ट्रगीते ओठांवर येत. एकदा राजकवी यशवंत दिनकर पेंढारकरांच्या कवितेतील
नकाशा पुढे पाहता भारताचा । महाराष्ट्र आधी भरे लोचनी ॥
या ओळी वाचल्या. पण खरे सांगायचे, तर राजाभाऊंचे महाराष्ट्रगीत ज्या दिवशी संपूर्ण वाचले, त्या दिवशी मी सजग मनाने महाराष्ट्राकडे पाहायला लागलो.
दि. २ जानेवारी १९६० रोजी मुंबईतील विराट सभेत पंडित नेहरूंनी घोषणा केली होती की, 'मराठी जनतेला जे हवे आहे, ते लवकरच येणार आहे.' शिक्षणमहर्षी डॉ. धोंडो केशव कर्वे यांनी त्याआधी प्रत्यक्ष भेटीत पं. नेहरूंना म्हटले होते की, मला संयुक्त महाराष्ट्र झालेला पाहायचा आहे. त्यानंतर महाराष्ट्र निर्मितीच्या दृष्टीने शासकीय स्तरावर जोरदार हालचाली होऊ लागल्या होत्या. दिनांक ७ जानेवारी १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्र समितीच्या सभेत संकल्पित नव्या राज्याला 'महाराष्ट्र' नाव द्यावे, असा ठराव संमत झाला होता. दि. १४ मार्च १९६० रोजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी जनतेच्या फार दिवसांपासूनच्या आशाआकांक्षा सुफलित होत असल्याची भावना व्यक्त केली होती. त्या वर्षीच्याच २८ मार्चला गृहमंत्री पं. गोविंदवल्लभ पंतांनी लोकसभेत द्वैभाषिक विभाजनाचे विधेयक मांडले. त्याला औपचारिक संमती मिळाली होती आणि त्यानंतरच्या घटनाक्रमाप्रमाणे दि. १ मे १९६० रोजी मुंबईत शिवाजी पार्कवर महाराष्ट्र स्थापनेचा सोहळा जाहीर झाला. लंडनच्या दौर्यावर जायला पं. नेहरू निघाले होते. त्यांनी त्या सोहळ्याला उपस्थित राहून मराठी माणसांना शुभेच्छा दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर निर्माण होणार्या महाराष्ट्राच्या मंगलपर्वाला पंचपंच उषःकाली राजा बढे यांसारखा कवी अंतर्यामी सूर सापडल्यासारखा आपल्याशीच गुणगुणत होता-
गर्जा महाराष्ट्र माझा ! जय जय महाराष्ट्र माझा !!
मुंबई महाराष्ट्राची व्हावी म्हणून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीने जोर धरला. त्यानंतरच्या अडीच-तीन वर्षांमध्ये या चळवळीला एक व्यापक स्वरूप प्राप्त झाले विविध पक्षांतील समाजधुरिण आणि नेत्यांनी एकत्र येऊन महाराष्ट्र निर्मितीचा प्रश्न धसाला लावला. त्यातच या चळवळीत झालेल्या एकशे पाच हतात्म्यांच्या बलिदानामुळे संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाला आचार्य अत्रे यांनी आपल्या वृत्तपत्रीय लेखनाने आणि प्रभावी व्याख्यानांनी नवे परिमाण दिले. मुंबईच्या चौकाचौकातील अत्र्यांची व्याख्याने रात्री दहा वाजता माधवबाग, रात्री बारा वाजता गिरगाव नाका, पहाटे दोन वाजता ठाकुरद्वार, पहाटे चार वाजता फणसवाडी अशा कालावधीत पार पडत. रात्रीपासून सकाळपर्यंत मुंबईतील हे रस्ते गजबजलेले असत. आचार्य अत्र्यांच्या पाठोपाठ भारलेला जनसमुदाव पदयात्रा करीत या व्याख्यानासाठी येई. 'जय महाराष्ट्रा'च्या आरोळ्यांनी सर्व परिसर दुमदुमून जाई.
'हिज मास्टर्स व्हॉईस (HMV)' ने या आंदोलनाच्या वेळी नव्या महाराष्ट्रगीतांची एक खास ध्वनिमुद्रिका त्वरित काढण्याचे ठरविले. त्यासाठी संगीतकार श्रीनिवास खळे यांच्या स्वरसाजावरच्या गाण्यांसाठी गीतांची निवड करण्यासाठी प्राथमिक तयारी सुरू झाली.
याच दरम्यान माझे मित्र ज्योतिर्भास्कर श्री. जयंतराव साळगावकर यांनी त्यांच्या शब्दरंजन प्रकाशनातर्फे महाराष्ट्र गौरवगीतांचा एक नवा संग्रह पुस्तकरूपाने प्रसिद्ध करण्याचे ठरविले आणि त्याच्या संपादनाची जबाबदारी त्यांनी माझ्यावर सोपवली. स्वातंत्र्यपूर्वकाळात आपल्या मराठी कवींनी लिहिलेली काही गीते माझ्या संग्रही होती; परंतु संयुक्त महाराष्ट्राच्या निमित्ताने विद्यमान प्रथितयश कवींकडून नव्या महाराष्ट्रगीतांच्या रचना व्हाव्यात म्हणून या कवींना प्रत्यक्ष भेटून जयंतराव साळगावकर आणि मी नेटाने प्रयत्नाला लागलो. त्याप्रमाणे कवी यशवंत, स. अ. शुक्ल, वा. गो. मायदेव, बा. भ. बोरकर, ग. दि. माडगूळकर, सोपनदेव चौधरी, शांता शेळके आदी कवी-कवयित्रींना प्रत्यक्ष भेटून त्यांच्याकडून नवी कोरी महाराष्ट्रगीते मिळविली.
याच महाराष्ट्रगीतांच्या जमवाजमवीच्या मोहिमेवर मी एकदा चक्क राजाभाऊंच्या शिवाजी पार्कच्या किशोरी विहारला जाऊन पोहोचलो. त्यांच्या घरच्या पाळीव पोपटाने 'कोण रे तू?' असा रखवालदारी प्रश्न मला विचारला. त्यावर राजाभाऊंनी त्याचा तो प्रश्न ऐकून आधी मी कोण ते आपल्या पोपटाला सांगितले, मग राजाभाऊंच्या आणि माझ्या गप्पा सुरू झाल्या. "तुम्हाला मी माझी महाराष्ट्रगीताची नवी रचना देतो", असे म्हणून राजाभाऊंनी त्या गीताचे शब्द ऐकवले- 'गर्जा महाराष्ट्र माझा ! जय जय महाराष्ट्र माझा !!'
एखाद्या ऋषिमुनीच्या तोंडून मंत्रोच्चार ऐकावेत तशी ती ओळ राजाभाऊंच्या मुखातून ऐकताच मी सुखावलो.
"सध्या मी अशी सर्व नवी महाराष्ट्रगीते गोळा करतोय", म्हणून कोणी कोणी गीते दिली त्यांच्या नावांचा पाढा ऐकून राजाभाऊंनी मंद स्मित केले आणि आपला 'राजहंसी' पानांचा डबा आतिथ्यशीलतेने पुढे केला. ती कविता त्यांच्या मनात घोळत होती, परंतु तोपर्यंत कागदावर उतरली नव्हती. "फ्रेश फ्रॉम दि ओव्हन. आज दुपारनंतर आपण केव्हाही आकाशवाणीवर भेटू. त्यावेळी तुम्हाला पूर्ण कविता देतो." आणि खरोखरच त्या दिवशी दुपारी राजाभाऊंनी आपल्या त्या नव्या कवितेची सुंदर टंकलिखित प्रत माझ्या हाती सोपवली.
तिकडे एच.एम.व्ही.त ध्वनिमुद्रणासाठी महाराष्ट्रगीतांच्या प्राथमिक निवडी चालल्या होत्या. या वेळेपर्यंत संगीतकार खळ्यांच्या हाती जी तीन नवी महाराष्ट्रगीते ध्वनिमुद्रणाच्या चाचणीसाठी आली होती, त्या तीनही गीतांना त्यांनी चाली लावल्या. ही गीते होती- 'गर्जा महाराष्ट्र माझा', 'महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय, जय जय राष्ट्र महान' आणि 'एक दिलाने एक स्वराने गाऊ' हे सहगान. ती अनुक्रमे राजा बढे, चकोर आजगावकर आणि एक माझं होतं. गायक, संगीतकाराच्या चाली, बाजारपेठेचे विश्लेषण इत्यादी सर्व गोष्टींचा सम्यक विचार करून नंतर केवळ दोन गीते ७८ आरपीएम वर करायची असल्यामुळे प्रकल्पासाठी पहिली दोन गीते निवडली गेली. तिसरे गीत पुढे आकाशवाणीवरून प्रक्षेपित झाले आणि रसग्रहणासाठी व प्रश्नोत्तरे देण्यासाठी दहावीच्या मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत अधूनमधून दाखल होऊ लागले.
योग्य वेळी राजाभाऊंनी आणि चकोर आजगावकर यांनी लिहिलेली ही दोन महाराष्ट्रगीते शाहीर साबळे या सुप्रसिद्ध गायकाकडून संगीतकाराच्या स्वरसाजावर ध्वनिमुद्रित करण्यात आली. त्यातील राजाभाऊंच्या महाराष्ट्रगीताला महाराष्ट्राप्रमाणेच परप्रांतातही अमाप लोकप्रियता लाभली.
राजाभाऊंची 'रामराज्या'तील गाणी महात्मा गांधींनी तो बोलपट पाहताना ऐकलीच होती. सोलापूरच्या एप्रिल १९६० मध्ये भरलेल्या शेतकी मेळाव्यात जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूंनी पंतप्रधानपदी असताना हजेरी लावली, तेव्हा त्यांच्यासमोर हे गीत गाऊन त्यांनी पंडितजींचीही मनपसंती मिळविली होती.
(संपादित)
गंगाधर महाम्बरे
'कविश्रेष्ठ राजा बढे- व्यक्ती आणि वाङ्मय' या गंगाधर महाम्बरे लिखित पुस्तकातून.
सौजन्य- नंदिनी पब्लिशिंग हाऊस, पुणे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.