ही तुमची भारतमाता
हे भारतीयांनो ऐका, बलिदान कथा वीरांच्या
झुंजता निमाले दीप, सागरात अंधाराच्या
त्या चिरंजीव आत्‍म्‍यांनी, रक्‍ताने लिहिली गाथा
ही तुमची भारतमाता, ही माझी भारतमाता
जय जवान जय किसान

जे प्राणपणाने लढले, युद्धातच कामी आले
आत्म्यास लाभता मुक्‍ती देहाचे सोने झाले
ऐकता कहाणी त्यांची अंगावरी येतो काटा
ही तुमची भारतमाता, ही माझी भारतमाता
जय जवान जय किसान

ती पहा फोडिते टाहो, वीराची विधवा पत्‍नी
कोमेजून निजली सारी भवतीने बाळे चिमणी
हे चित्र ठेवुनी मागे तो निघुनी गेला त्राता
ही तुमची भारतमाता, ही माझी भारतमाता
जय जवान जय किसान

भडिमार उडे तोफांचा सरसावून सीमेवरती
धिप्पाड वज्रदेहांच्या बांधल्या जणू तट भिंती
बेहोष होऊनी लढले, गुणगान आईचे गाता
ही तुमची भारतमाता, ही माझी भारतमाता
जय जवान जय किसान

ठिणगीला भिडली ठिणगी, पेटली भारती जिद्द
विध्वंसी क्रांतिसंगे संयमी शांतीचे युद्ध
हरएक शिपाई झाला जणू भारतभाग्य विधाता
ही तुमची भारतमाता, ही माझी भारतमाता
जय जवान जय किसान

त्या ज्वलंत इतिहासाचे प्रत्येक पान सोनेरी
या शब्दांशब्दांमधुनी झडतील उद्या रणभेरी
व्हा पुढे राष्ट्रवीरांनो उंचावून आपुला माथा
ही तुमची भारतमाता, ही माझी भारतमाता
जय जवान जय किसान

घेऊन झेप वाघाची शत्रूवरती तुटुनी पडला
पाहून तेज शिवबाचे सह्याद्री जागा झाला
घ्या शपथ मायभूमीची ठेचण्या पाशवी सत्‍ता
ही तुमची भारतमाता, ही माझी भारतमाता
जय जवान जय किसान