पालखी हाले डुले

भास एक स्वप्‍नातला, रंग हळदीचा ओला

नवरी मी सजुन अशी, निघाले कोण्या देशी ?
घेउनी मला कुठे पालखी चाले कशी ?

चांद उतरला खाली, रात पहाटेला आली
वारा वाहे झुळूझुळू, पालखी चाले हळू
वर-खाली वाट वळे, गोंडा रेशमी झुले
दूर का गाती पर्‍या ? सूर ते कानी आले
पालखी हाले डोले !

हळूहळू सांज झाली, पालखी उतरे खाली
भुलूनी गेले डोळे भिरभिर भवताली !

थोर नगरीत वसे, सात तालांचा हसे,
वाडा सामोरा उभा कुण्या राजाचा दिसे !
खांब केळीचे उभे, वरती तोरण शोभे
दारी चौघडा गाजे, सूर सनईचा वाजे !

तनूलागी कंप सुटे ! बाई मी आले कुठे ?
डंवरला घाम भाळी, लवले डोळे खाली !
अवचित कोणी आला, वरमाला घाळी गळा
हात कधी हाती दिला, नाही कळले मला

हनूला धरून माझ्या काहीसे बोले राजा
वाटे मजला भीती, ऊर धडधडे किती
नजरेसी मिळे नजर, नकळत ढळे पदर
घडली जादू अशी, झाले ग वेडीपिशी !

ऊठ पोरी ऊठ आता, जायचे नं शेतावरी
जागवीत बाबा होते, स्वप्‍न सरलेले होते !

चला बिगीबिगी चला,
शेत नांगराया चला
डोईवर दिसं आला !

हळूहळू बाबांसंगे, चालायचे-चालायचे
ऋतू येती, ऋतू जाती, शेतावरी राबायाचे
सोनियाचे स्वप्‍न माझे, सोनेरी या धनासंगे
रंगायाचे-उरायाचे, सरायाचे-विरायाचे

 

Random song suggestion