A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
पैल तो गे काऊ कोकताहे

पैल तो गे काऊ कोकताहे ।
शकुन गे माये सांगताहे ॥१॥

उड उड रे काऊ तुझे सोन्यानें मढवीन पाऊ ।
पाहुणे पंढरीरावो घरा कैं येती ॥२॥

दहिंभाताची उंडी लावीन तुझे तोंडी ।
जिवा पढिये त्याची गोडी सांग वेगी ॥३॥

दुधें भरूनी वाटी लावीन तुझें वोंठी ।
सत्य सांगे गोठी विठो येईल कायी ॥४॥

आंबया डहाळी फळें चुंबी रसाळीं ।
आजिचे रे काळीं शकुन सांगे ॥५॥

ज्ञानदेव ह्मणे जाणिजे ये खुणें ।
भेटती पंढरीराये शकुन सांगे ॥६॥
उंडी - नैवेद्य.
कै - केव्हा.
गोठी - गोष्ट.
पढिये - आवडते.
भावार्थ-

प्रियकराच्या भेटीसाठी आतुर झालेल्या स्त्रीरूपातून परमेश्वरभेटीसाठी वाट पाहणार्‍या भक्ताचा प्रत्‍यय येथे ज्ञानेश्वर देत आहेत. या अभंगाचा विशेष असा की, लोकमानसात रुजलेल्या लोकसंकेताचा ते वापर करून घेतात. स्त्रीचे अनुभवविश्वही ते नेमकेपणाने प्रकट करतात. घास भरवण्याला स्त्रीच्या विश्वात अतिशय महत्त्वाचे स्‍थान असते. येथे कावळा ओरडतो आहे म्हणजे पाहुणा येण्याचा शुभशकूनच ज्ञानेश्वर सांगतात. आता हा पाहुणा म्हणजे जिवाचा जिवलग, प्रियकर श्रीविठ्ठलच. त्याच्या येण्याची सूचना देणार्‍या कावळ्याला कुठे ठेवू आणि कुठे नको असे तिला झाले आहे. तो उडून चालला की तिची अधीरता अधिकच वाढते. ती त्याच्या पायाला सोन्याचे वाळे घालण्याचे, दहिभाताचा गोळा त्याला देण्याचे, वाटीभरून दूध देण्याचे कबूल करते. या सगळ्यातून तिला जाणून घ्यायचे आहे की, विठ्ठलाचे आगमन नक्की होणार ना? आणि कधी होणार? एवढेच नाही तर तिचे अधीर मन त्याला आंब्याच्या डहाळीवरच्या आम्रफळांचाही मोह घालते आहे. म्हणजे तुला हवं ते, आवडेल ते सारं सारं मी देत्ये पण मला सांग की विठ्ठल येणार ना नक्की?

डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, डॉ. द. ता. भोसले
ज्ञानेश्वरांचे निवडक शंभर अभंग
सौजन्य- प्रतिमा प्रकाशन, पुणे.

* ही लेखकांची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

 

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.